पिंपरी-चिंचवड शहरात होर्डिंगसाठी झाडांचा बळी 

पीतांबर लोहार
Tuesday, 8 September 2020

  • पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी रस्त्यासह शहर परिसरातील स्थिती

पिंपरी : शहरात लावलेले जाहिरात फलक (होर्डिंग) दिसण्यासाठी सर्रासपणे वृक्षतोड व छाटणी केली जात आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून, पर्यावरणाची हानी होत आहे. उद्यान विभागाकडे तक्रार केल्यास केवळ पंचनामा केला जातो. दोषींवर काहीही कारवाई केली जात नाही. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब

भोसरीतील विद्युत रोहित्र स्फोटप्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची उद्या बैठक ​

वेगवेगळ्या उत्पादने, कंपन्या, बांधकाम व्यावसायिकांकडून जाहिरात फलक शहरात लावले जातात. त्यासाठी महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाकडून जागा निश्‍चित करून होर्डिंगसाठी लोखंडी सांगाडा उभारून दिला जातो. ठराविक कालावधीसाठी ठेकेदाराकडे ते दिले जातात. त्यासाठी सदर कालावधीचे शुल्क आकारले जाते. ठेकेदार जाहिरातदारांकडून शुल्क वसूल करून जाहिरात करीत असतो. आकारानुसार पंधरा प्रकाराचे होर्डिंग लावण्यास महापालिकेची परवानगी आहे. यात सर्वांत लहान होर्डिंग सहा बाय सहा फुटांचे, तर सर्वांत मोठे होर्डिंग 60 बाय 20 फूट लांबी, रुंदीचे आहेत. 

अंघोळीची गोळी संस्था म्हणते... 

जाहिरात फलक दिसावेत, यासाठी वृक्षतोड व छाटणी केली जात आहे. याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाकडे गेल्या दोन वर्षांपासून तक्रार केली जात आहे. मात्र, वृक्षतोड व छाटणीचे प्रकार वाढतच आहेत. असे प्रकार विशेषतः रात्री घडत आहेत. याबाबत उद्यान विभागाकडून केवळ पंचनामा केला जातो. त्यातही तोडलेल्या वृक्षांची संख्या व छाटणीचे प्रमाण बघितले जाते. होर्डिंग लावण्यास परवानगी देताना महापालिकेने मार्गदर्शक सूचनाही करायला हव्यात. अन्य देशांत होर्डिंग लावण्यास मनाई आहे, वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अंगोळीची गोळी संस्थेचे कार्यकर्ते माधव पाटील, सचिन काळभोर, तनय पटेकर यांनी महापालिका आयुक्त व महापौर यांच्याकडे केली आहे. 

वृक्षतोड व छाटणीची ठिकाणे 

पिंपळे सौदागर येथील 18 मॉल व सावित्रीबाई बीआरटी बस स्टॉप परिसर; वाकड येथील कस्पटे चौक, मानकर चौक, सनराईज नर्सरी, क्रोमा मॉल, कस्पटे कॉर्नर, महिंद्रा सह्याद्री शोरूम व देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्गावरील उड्डाणपूल परिसर; हिंजवडीतील डी-मार्ट व इन्फोसिस सर्कल परिसरातील झाडे तोडलेली आहेत. 

पिंपळे सौदागर-हिंजवडी दरम्यानची स्थिती 

  • होर्डिंगची ठिकाणे : 11 
  • होर्डिंगची संख्या : 17 
  • वृक्षतोड व छाटणी : 38 

शहरातील होर्डिंग 

  • एकूण ठिकाणे : 1121 
  • होर्डिंग संख्या : 1769 

आंघोळीची गोळी, संस्थेची तक्रार आमच्याकडे आली आहे. उद्यान विभाग व आकाश चिन्ह परवाना विभागातील अधिकाऱ्यांकडून पाहणी करून पंचनामा केला जाईल. वृक्षतोडप्रकरणी संबंधितांना नोटीस देऊन कारवाई केली जाईल. होर्डिंगसाठी आकाश चिन्ह परवाना विभाग परवानगी देते, तर उद्यान विभाग ना हरकत दाखला देते. 
- दत्तात्रेय गायकवाड, उद्यान अधीक्षक, महापालिका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tree cutting for hoardings in pimpri chinchwad city