...म्हणून आयटीयन्समध्ये सायकलचा ट्रेंड

...म्हणून आयटीयन्समध्ये सायकलचा ट्रेंड

पिंपरी : विमानगरला 'टूलटेक' या कंपनीत मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे. माझं वय 35. दररोज जाऊन-येऊन 70 किलोमीटरचं अंतर मी सायकलवरून कापतोय. सध्या देहूमध्ये राहतो. गीता विधाटे माझी पत्नी तळवडे आयटी कंपनीत आहे. आठवड्यातून दोन दिवस तीही सायकलवरून कामाला जाते. गेल्या साडेतीन वर्षांपासून आम्ही सायकल स्नेही झालोत. पूर्वी कार पुलिंग करायचो. आम्हा पती-पत्नीची सायकलची आवड पाहून कंपनीतील इतरही सहकारी सायकलला पसंती देऊ लागलेत. कोणत्याही वाहनांवर प्रवासासाठी आम्ही अवलंबून न राहता सायकलवरूनच नोकरीला जातो. कंपनीत सध्या 30 टक्के तरुण सायकलचा वापर करताहेत. बऱ्याच तरुणांचं आता सायकलमुळं व्यसनही सुटल्याचं मारुती विधाटे सांगताहेत. 

वसुंधरेची जपणूक करण्यासाठी आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्यासाठी आयटीयन्सनं आता सायकललाच पसंती दिलीय. सध्या आयटीयन्समध्ये सायकलचा ट्रेंड वाढलाय. पुणे, तळवडे व हिंजवडी आयटी पार्कमध्ये तब्बल तीन हजारांच्यावर आयटीयन्स सायकलवरूनच कंपनीत कामाला जातात. याबद्दल कंपन्यांनीही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सायकल पार्किंग, वॉशरूम व चेंजिंग रूम उपलब्ध करून दिल्यात. त्यामुळे शहराची वाटचाल सायकल फ्रेंडलीकडं सुरूय. 

18 किलो वजन घटलं 

इंडो ऍथलेटिक सोसायटीचे सदस्य गिरिराज उमरीकर म्हणाले, ""मी मोशी स्पाईन रोड येथे राहतो. माझं वय 37, वजन 92 किलो होतं. आता ते 76 किलो झालंय. मी केवळ कंपनीत जाण्यासाठीच सायकलचा वापर करतो. सध्या ऍटॉस सिंटेल कंपनीत सायकलसाठी प्रोत्साहन दिलं जातंय. आम्हाला कंपनीनं स्वतंत्र पार्किंग, चेंजिंग रूम, वॉशरूम दिलंय. सुमारे 125 जण कंपनीत सायकलवर येतात. मी दररोज 18 किलोमीटर सायकल चालवतो. व्यायामासाठी वेगळा वेळ दिला जात नाही. त्यामुळं हा पर्याय योग्य वाटतो. 

सायकल टू वर्क 

सायकल चळवळ शहरात रुजण्यासाठी "सायकल टू वर्क' हे मिशन राबविण्यात येतंय. सायकलसाठी सरकारनं प्रयत्न करावेत. काही संस्था सायकल दानासाठी पुढे येताहेत. पुणे महापालिकेत एकमेव सायकल विभाग आहे. सायकलचा वापर वाढण्यासाठी झटका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 500 जनहित सह्यांची याचिका आम्ही पुणे महापालिकेत दाखल करणार आहोत, असं बाणेर जीएस लॅबचे आयटी अभियंता अभिजित कुपटे यांनी सांगितलं. 

या कंपन्यांमध्ये सुरूय सायकल क्‍लब 

डॅसॉल्ट, टूलटेक, ऍटॉस सिंटेल, कॅपजेमिनी, स्टेरिआ, इन्फोसिस, विप्रो, टीसीएस, टेक महिंद्रा, आयबीएम, सिनेक्रॉन, टाटा मोटर्स, थरमॅक्‍स 

सायकल का गरजेची? 

- प्रदूषण विरहित प्रवास 
- इंधनातून बचत 
- वाहतूक कोंडीतून सुटका 
- सायकल ट्रॅकचा योग्य वापर 
- स्वतंत्र व्यायामाची गरज नाही 
- देखभाल-दुरुस्तीचा त्रास वाचतो 
- पार्किंगची कटकट नाही 

Edited by Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com