लोणावळा : आदिवासीबहुल कुणेनामा झाले कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

ठाकर व कातकरी आदिवासी लोकवस्ती असलेले कुणेनामा कोरोनामुक्त झाले आहे.

लोणावळा  : ठाकर व कातकरी आदिवासी लोकवस्ती असलेले कुणेनामा कोरोनामुक्त झाले आहे. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत कुणेनामा येथील ४५३ कुटुंबातील एक हजार ९३८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. कुणेनामा येथे कोरोनाबाधित असलेले १७ रुग्ण बरे झाल्याने कुणेनामा कोरोनामुक्त झाल्याची माहिती उपसरपंच संजय ढाकोळ व ग्रामपंचायत सदस्य रामदास पांडवे यांनी दिली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अभियानदरम्यान गावात सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. तपासणी मोहीम व सर्वेक्षणासाठी शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे दहा गट तयार केले होते. ग्रामविकास अधिकारी दमयंती शेंडगे, ग्रामपंचायत सदस्य पांडवे यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत सर्वेक्षणासाठीच्या साहित्यांचे वाटप केले. तपासणी मोहिमेदरम्यान येथील ६० वर्षांवरील एक हजार २३० नागरिकांची तपासणी झाली. 

काय सांगता! परप्रांतीय कामगारांना चक्क विमान तिकिटांची भेट

आदिवासींसह धनदांडग्यांचे विकेंड होम्स, बंगले, रिसॉर्ट याठिकाणी आहेत. यामध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांचीही पल्स ऑक्सिमीटर, टेम्परेचर गनच्या आधारे तपासणी झाली. २४ कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. मात्र, त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आली. ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करत जनजागृतीसाठी जागोजागी फलक लावण्यात येत असल्याचे ढाकोळ व पांडवे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tribal dominated kunenama became corona-free lonavala maval