
शिरोता विभागातील साई हद्दीतील वनक्षेत्रात कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचवून एका भेकराच्या पिल्लाला आदिवासी लोकांनी जीवदान दिले आहे.
आदिवासींनी वाचविले भेकराचे प्राण
टाकवे बुद्रुक - शिरोता विभागातील साई हद्दीतील वनक्षेत्रात कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचवून एका भेकराच्या पिल्लाला आदिवासी लोकांनी जीवदान दिले आहे.
बुधवारी भेकर मादी व पिल्लावर काही कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांच्या हल्ल्यात मादी जंगलाच्या दिशेने पळून गेली व पिल्लू एका दगडाच्या आडोशाला लपून बसले. रानभाजी आणण्यासाठी गेलेल्या नवनाथ हिलम व रोहिदास हिलम या आदिवासी तरुणांनी हे पिल्लू पाहिले. पिल्लू खूप लहान असल्याने एकटे त्यास जंगलात सोडून देणे अशक्य होते. त्यामुळे तरुणांनी त्यास घरी आणून ठेवले. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या भेकराच्या पिल्लाला त्यांनी मायेची ऊब दिली. दूध विकत आणून बाटलीने पाजले.
नवनाथ हिलम याने वन्यजीवरक्षक संस्थेचे सदस्य सचिन वाडेकर व उमेश धुमाळ यांना पिल्लाबाबत माहिती दिली व कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात सोडा असे सांगितले. वन्यजीवरक्षक टीमच्या सदस्यांनी याबाबत माहिती वनविभागाला दिली. मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण, उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली, सहायक वनसंरक्षक मयूर बोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आईपासून हरवून रस्ता चुकलेले ते भेकराचे पिल्लू वनविभाग व वन्यजीव रक्षक संस्था मावळ यांनी संयुक्तपणे रेस्क्यू केले.
वडगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात वनपरीक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार, वनपाल मंजूषा घुगे, वनरक्षक गणू गायकवाड, शंकर घुले तसेच प्राणीमित्र जिगर सोळंकी यांनी त्या पिल्लाची शारीरिक तपासणी करून त्यास पुढे पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल संस्थेत पाठवले आहे. भेकराचे पिल्लाला अधिवासात सोडण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावर यांनी सांगितले.
तरुणांचे कौतुक
कातकरी आदिवासी लोक हे मुळात मासेमारी, मोलमजुरी करणारे लोक. पूर्वी हे लोक शिकार करीत असत. पूर्वी या लोकांकडून होत असलेल्या शिकारी सध्या बंद झाल्या आहेत. भेकराच्या पिल्लाला वाचविल्याबद्दल या आदिवासी तरुणांचे कौतुक होत आहे.
Web Title: Tribal Saved The Sheeps Life
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..