Video : 'त्यांनी' गावी जाण्यासाठी 267 किलोमीटर पायपीट केली अन् पिंपरीत...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील 22 स्थलांतरित कामगार, बांधकाम मजूर हे कोल्हापूरवरून मूळगावी पायी चालत निघाले.

पिंपरी : "उत्तर प्रदेश की बॉर्डर पर वहॉं के सरकारने पैदल चल रहे या प्रायव्हेट गाडी से जाने वाले लोगों को रोके रखा है... इसलिए हम प्रशासन की अनुमती से रेलद्वारा गॉंव जाना चाहते है...हमे गॉंव जाना है...हमे कम से कम यूपी बॉर्डर तक तो छोडने की व्यवस्था प्रशासनने कर देनी चाहिए,'' अशी विनंती वजा मागणी कोल्हापूरवरून तब्बल 267 किलोमीटरची पायपीट करत आलेल्या उत्तर प्रदेशातील स्थलांतरित कामगारांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील 22 स्थलांतरित कामगार, बांधकाम मजूर हे कोल्हापूरवरून मूळगावी पायी चालत निघाले. चार दिवसांत तब्बल 267 किलोमीटरची पायपीट करून पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाल्यावर त्यांना 17 दिवसांपासून पिंपरीनगर येथील निवारा केंद्रांत ठेवण्यात आले आहे. मात्र, गावाकडची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. हे लोक त्यांच्या मूळगावी परतण्याची आतुरतेने वाट पहात आहेत. 

मुंबई, बेंगलोर येथून गावाकडील लोक निघाल्याने उत्तर प्रदेशातील 19 आणि झारखंडमधील 3 लोकांचा समूहदेखील कोल्हापूरवरून उत्तर प्रदेशला जाण्यास निघाला. त्यामध्ये मध्यप्रदेशचेही काही स्थलांतरित कामगार, मजूर होते. परंतु, गावी जाण्यासाठी कोणतीच वाहन व्यवस्था झाली नसल्याने सर्वजण पायपीट करतच गावी निघाले. परंतु, पिंपरी-चिंचवड येथे आल्यावर त्यांना पोलिसांनी पिंपरीनगर येथील कमला नेहरू प्राथमिक विद्या मंदिराच्या तात्पुरत्या निवारा केंद्रात ठेवले आहे. पालिकेच्या सर्व निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित मजूरांची सर्वाधिक संख्या सध्या याच केंद्रावर आहे. त्यांच्यासाठी एकूण 3 वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील निगाईगावचा रवींद्र कुमार म्हणाला, "कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकठिकाणी आम्ही बांधकाम प्रकल्पांवर काम करत होतो. सुरुवातीला कंपनीने आम्हाला जेवण दिले. मात्र, त्यानंतर आम्हाला पैसे मिळणे बंद झाले. बांधकाम कंपनी म्हणत होती ठेकेदाराकडून पैसे घ्या. ठेकेदार म्हणायचा मला कंपनीने कामच दिले नाही तर मी पैसे कुठून देणार? लॉकडाउनही कधीपर्यंत चालेल याची खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही गावी जाण्याचा निर्णय घेतला. आमच्यातील काही लोकांची कोविड 19 ची तपासणी करून त्यांना गावी बसने पाठवणी करण्यात आली. परंतु, आमची काही व्यवस्था झाली नाही. त्यामुळे आम्ही पायीच गावी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, इथे आल्यावर आम्हाला पोलीसांनी शाळेत ठेवले आहे. आम्हाला दोनवेळेचे जेवण मिळत आहे. परंतु, गावाकडील नातेवाईक आम्हाला सतत विचारत आहेत.. तुम्ही कधी येणार ?, तुम्हाला सोडण्याची व्यवस्था होत आहे की नाही ?'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

व्यवस्था करण्याचे निव्वळ आश्‍वासन...

मागील 17 दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून युपीच्या स्थलांतरित कामगारांना तुमच्या पाठवणीची व्यवस्था करतोय, असे आश्‍वासन दिले जात आहे. मात्र, अजूनही त्यांना त्यांच्या मूळगावी पाठविण्यात आलेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty-two migrant workers from Uttar Pradesh and Jharkhand towards home