दारूसाठी पैसे न दिल्याने भावंडांना लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण; वाहनांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत लाकडी दांडक्‍याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या खिशातून पानटपरीतील गल्ल्याची पिशवी जबरदस्तीने काढून घेतली. दरम्यान, फिर्यादीचा भाऊ मदतीला आला असता आरोपींनी त्यांनाही जमिनीवर पाडून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

पिंपरी : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून तिघांनी मिळून दोघा भावंडांना लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केली. पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी देत रिक्षासह पाच दुचाकींची तोडफोड करीत परिसरात दहशत माजविली. ही घटना चिंचवडमधील बिजलीनगर येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सागर संतोष मिरगणे (वय 24, रा. गुरूद्वारा रोड, बिजलीनगर, चिंचवड), रवी आप्पालाल कोळी (वय 19, रा. चिंतामणी चौक, बिजलीनगर, चिंचवड), विकास नागनाथ कोळी (वय 22, रा. मोरयानगर, वेताळनगर, चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी योगेश बापू चंदनशिवे (वय 21, रा. चंद्रभागा कॉलनी, स्पाईन रोड, बिजलीनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. गुरूवारी (ता.5) रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी हे चंद्रभागा कॉलनी येथील रस्त्याने पायी जात असताना आरोपींनी त्यांना अडवून पैसे मागितले.

फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत लाकडी दांडक्‍याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या खिशातून पानटपरीतील गल्ल्याची पिशवी जबरदस्तीने काढून घेतली. दरम्यान, फिर्यादीचा भाऊ मदतीला आला असता आरोपींनी त्यांनाही जमिनीवर पाडून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. आरोपी रवी कोळी याने फिर्यादीच्या खिशातील पाकिट काढून घेतले. तर मिरगणे याने पोलिसात गेल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तेथून जाताना आरोपींनी मिरगणे याच्या रिक्षात ठेवलेली लाकडी दांडकी काढून फिर्यादीच्या रिक्षाची काच फोडली. तसेच चंद्रभागा कॉलनीत आरडाओरडा करीत तेथील पाच दुचाकींची तोडफोड करून परिसरात दहशत माजविली. चिंचवड पोलिसांनी तिनही आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. 

हृदयद्रावक : वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मुलगा बुडाला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vandalizing vehicles for not paying for alcohol in pimpri