चिंचवडमध्ये टोळक्‍याचा राडा; कोयते भिरकावत वाहनांची तोडफोड 

Vehicle Damage
Vehicle Damage

पिंपरी - 'आम्ही मोहननगरचे भाई आहोत, आम्हाला हप्ता का देत नाही. 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी पैसे पाहिजे', असे म्हणत चौदा जणांच्या टोळक्‍याने चिंचवडमधील मोहननगरमध्ये राडा घातला. चार जणांना बेदम मारहाण करीत परिसरातील पाच वाहनांची कोयत्याने तोडफोड केली. आरडाओरडा, शिवीगाळ, दमदाटी करीत कोयते भिरकावून परिसरात दहशत माजवली. हा प्रकार गुरुवारी (ता. 31) रात्री घडला. 

दीपक गिरी, युवराज काळे, आशिष गोरखा, ऋषिकेश शिंदे, बाळासाहेब गवळी, प्रमोद बनगर, रोहित देशमुख, आकाश गायकवाड, अक्षय लोंढे, घनश्‍याम साळुंखे, आशिष कांबळे, अरविंद ऊर्फ सोन्या काळे, सुबोध ढवळे, करण ससाणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (ता. 31) रात्री दहाच्या सुमारास राहुल बबन अलंकार (रा. मोहननगर, चिंचवड) हे रस्त्यावर उभे असताना आरोपी तेथे आले. "शाळेची वर्दी करतो, पैसे कमवतो, आम्ही मोहननगरचे भाई आहोत हे तुला माहीत नाही का? तू आम्हाला हप्ता देत नाही' असे म्हणत त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील मोबाईल व एक हजाराची रोकड लुटून पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अलंकार यांच्या मोटारीच्या काचा फोडल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच, संतराम अर्जुन जगताप हे रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांची मोटार पार्क करण्यासाठी बाहेर आले असता, त्यांनाही आरोपींनी धमकी व शिवीगाळ केली. "तू आम्हाला हप्ता देत नाही, आज 31 डिसेंबर आहे, पार्टीसाठी पैसे पाहिजे' असे म्हणत त्यांच्या मोटारीतील टेप, साउंड बॉक्‍स काढून घेत मोटारीच्या काचा फोडल्या. तेथून जाताना रस्त्यालगतच्या लाईटच्या काचाही फोडल्या.

बापू अण्णा अलंकार हे रात्री सव्वा अकराच्या सुमारास घरासमोरील त्यांच्या मोटारीतून लॅपटॉप काढत असताना, तेथे आलेल्या आरोपींनी त्यांच्याकडील लॅपटॉप हिसकावून घेतला. अलंकार यांनी प्रतिकार केल्यावर त्यांना कोयत्याचा धाक दाखवून "तू जर आरडाओरडा केला, तर तुला खल्लास करून टाकू' अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी अलंकार यांच्या मोटारीसह शेजारील आणखी एका मोटारीच्या काचा कोयत्याने फोडून पसार झाले. तसेच, सव्वा बाराच्या सुमारास पप्पूलाल सय्यद शेख यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रिक्षा व्यवसायाचे 740 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांच्या रिक्षाच्या काचा फोडून नुकसान केले. 

या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 
 
पोलिस छावणीचे स्वरूप 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह उपायुक्त, सहायक आयुक्तांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना तपासासंदर्भात सूचना दिल्या.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com