Pimpri : आणखी काही महिने दिवसाआडच पाणीपुरवठा होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri chinchwad

आणखी काही महिने दिवसाआडच पाणीपुरवठा होणार

पिंपरी : शहरात २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. या निर्णयाला गुरुवारी (ता. २५) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, निगडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवली नाही, केंद्र सरकारच्या ‘अमृत’ व ‘चोवीस बाय सात’ योजनेअंतर्गतची काही कामे आणि आंद्रा व भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत चिखली जलशुद्धीकरण केंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना आणखी काही महिने दररोज पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनियमित, अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा शहराच्या जवळपास सर्वच भागात होत होता. उंचावरील ठिकाणे व निगडी जलशुद्धीकरण प्रकल्पापासून लांब अंतरावरील उपनगरांमधील नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत होते. शिवाय, काही भागात पाणी वाया जात होते, तर काही भागात पाणी मिळत नव्हते. त्यामुळे समन्याय पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी १८ ऑगस्ट २०१९ रोजी आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, सात दिवसांचे वेळापत्रक केले होते.

तरीही पाण्याबाबत तक्रारी कायम राहिल्याने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी २५ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू आहे. त्यावेळी निगडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवणे, ‘अमृत’ व ‘चोवीस बाय सात’ची कामे पूर्ण करून पाणी गळती व चोरी थांबवणे, भामा-आसखेड व आंद्रा धरणातून पाणी आणून चिखलीतील नियोजित जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण करणे आणि नोव्हेंबर २०२१ पासून दररोज पाणीपुरवठा करणे असे नियोजन केले होते. मात्र, अद्याप सर्वच कामे अपूर्ण असल्याने आणखी काही महिने दिवसाआड पाण्यावरच नागरिकांना तहाण भागवावी लागणार असल्याचे चित्र आहे.

आंद्रा, भामा-आसखेड योजना

आंद्रा व भामा-आसखेड धरणांतून अनुक्रमे १०० व १६८ दशलक्ष लीटर पाणी उचलण्याचे नियोजन आहे. त्यासाठी चिखलीत ३०० दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी, बोपखेल, भोसरी आदी भागात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी या भागात जनवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा: उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

नागरिक म्हणतात...

नळाला पूर्वी दररोज तीन तास पाणी यायचे. आता दिवसाआड पाणी येत आहे. सकाळी साडेसात वाजता आलेले पाणी बारा वाजेपर्यंत म्हणजे पाच-साडेपाच तास असते. त्यामुळे पुरेशा प्रमाणात मिळते. पण, दुसऱ्या दिवसासाठी साठवून ठेवावे लागते.

- उषा काळे, दापोडी

आमच्या भागात संध्याकाळी दोन-अडीच तासच नळाला पाणी येते. आमची सोसायटी छोटी असल्याने पुरेशे पाणी मिळते. पण, शेजारच्या सोसायट्यांतील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. कधी कधी काही जण आमच्या सोसायटीतून पाणी घेऊन जातात.

- अपर्णा सुतार,

मोशी-प्राधिकरण प्रशासन म्हणते...

‘अमृत’ व ‘चोवीस बाय सात’ योजनेअंतर्गत नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक कामे झाली आहेत. चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. त्याअंतर्गत जलवाहिन्या टाकल्या आहेत. सध्या दिवसाआड असला तरी, पुरेसा पाणीपुरवठा सुरू आहे.

- प्रविण लडकत, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा, महापालिका

loading image
go to top