बौद्ध धम्मात आषाढ पौर्णिमा व वर्षावासाचे काय महत्त्व आहे, जाणून घ्या...

What is the significance of Ashadh Pournima and Varshavasa in Buddhist Dhamma
What is the significance of Ashadh Pournima and Varshavasa in Buddhist Dhamma

पिंपरी  : बौद्ध धम्मात पौर्णिमेला फार महत्त्व आहे. कारण भगवान बुद्धाच्या जीवनात ज्या ज्या मंगल घटना घडल्या, त्या पौर्णिमेलाच घडलेल्या आहेत. त्यांच्या जीवनात पहिली पौर्णिमा आली ती आषाढ पौर्णिमा, अशा शब्दांत पंडित बाविस्कर गुरुजी यांनी पौर्णिमेचे महत्त्व सांगितले.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तक्षशिला बुध्दविहार गणेशनगर थेरगाव येथे पंचशील मंडळाच्या वतीने आषाढ पौर्णिमा अर्थात वर्षावास प्रारंभानिमित्त रविवारी (ता. 5) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत 'भगवान गैत्तम बुध्द व त्यांचा धम्म' या ग्रंथाचे वाचन  विहारामध्ये सुरू झाले. 
ग्रंथ वाचक पंडित बाविस्कर गुरूजी यांनी पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. आजपासून अर्थात आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या तीन महिने कालावधीत ग्रंथ वाचन सुरू असेल. 

आयटी पार्कमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय; आज कोणत्या भागात, किती रुग्ण आढळले पाहा 

पौर्णिमेचे पहिले महत्त्व 
पौर्णिमेचे पहिले महत्त्व सांगताना बाविस्कर गुरुजी म्हणाले, ''शाक्य लोकांत आणि त्या प्रांतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमे अगोदर सात दिवस ते अमावास्येपासून सात दिवस महोत्सव साजरा करीत असत. इ. स. पूर्व ५६३ ला कपिलवस्तूचे राज्यपद शुद्धोदन यांचेकडे होते.  राजा शुद्धोदन खूप श्रीमंत होता.  त्यांचे अनेक महाल, राजवाडे, नोकर-चाकर होते. हजारो एकर जमीन होती. तेथील रिवाजाप्रमाणे राजा शुद्धोदन स्वतः शेतात जाऊन मजूरांबरोबर शेतीचे काम करीत असे.  शुद्धोदनाच्या एका राणीचे नाव महामाया होते, तर दुसऱ्या राणीचे नाव महाप्रजापती गौतमी होते. त्यांना मूलबाळ नव्हते. ही खरी उणीव होती. त्या राजघराण्यात आषाढी पौर्णिमेच्या दिवशी महामायेने नोकरांकडून राजवाडा स्वच्छ केला. घरात भोजनासाठी गोड पदार्थ केले. नगरातील भिक्षुंना, गरीबांना चार लाख मोहरा दान केल्या. आनंदी वातावरण केले. सायंकाळी राजा घरी आल्यावर आनंदाने गोड-धोड भोजन केले. आणि राजा शुद्धोदन व राणी महामाया आपल्या शयन मंदिरात विश्रांतीसाठी गेले. दोघेही झोपेत असताना पहाटे महामायेला स्वप्न पडले. स्वप्नात महामायेचा पलंग चार देवगणांनी उचलला आणि हिमालयाच्या माथ्यावर एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून बाजूला उभे राहिले. त्या चार देवगणांच्या स्त्रिया आल्या व त्यांनी महामायेला 'मानस सरोवर' नावाच्या तळ्यावर नेले. तेथे सुगंधी द्रव्याने स्नान घातले. स्वच्छ वस्त्र, अलंकारांनी सजविले व स्वागत करून बाजूला उभ्या राहिल्या. समोरून सुमेध नावाचा बोधिसत्व हत्तीच्या रुपात आला व आपल्या सोंडेने सफेद कमळाचे फूल महामायेला देऊन तो बोधिसत्व म्हणाला,  "माते !  मी माझा शेवटचा जन्म तुझ्या कुशीत घेणार आहे. तू माझी आई होशील का ?"  महामाया म्हणाली, "हो, आनंदाने !" आणि तो सुमेध बोधिसत्व संपूर्ण तिच्या शरीरात सामावला. असा तिला स्वप्नात भास झाला आणि ती जागी झाली. त्या स्वप्नाचा तिला अर्थबोध होईना. तिने राजाला स्वप्नाची माहिती सांगितली. ती म्हणाली, "मला पुत्र प्राप्ती होत नाही म्हणून माझी स्वप्नात अशी कोणीतरी हीन चेष्टा तर करीत नाही ना ? मला फार मनस्ताप होत आहे." राजा शुद्धोदनाने स्वप्न विद्येत पारंगत असणाऱ्या आठ ब्राह्मणांना निमंत्रित केले. ते ब्राह्मण राम, ध्वज, लखन, मंती, यन्न, सुभोज, सुयाम, सुदत्त. या आठ ब्राह्मणांनी महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला की राजा ! तुझी राणी पुत्रवती होणार आहे. तुझा होणारा पुत्र एकतर सम्राट चक्रवर्ती राजा होईल किंवा संन्यास घेतला तर, तो महान बुद्ध होईल. अशी भविष्यवाणी सांगितली. आणि खरोखरच त्या पौर्णिमेला महामायेला गर्भधारणा झाल्याचे निश्चित झाले. म्हणून या पौर्णिमेला गर्भमंगल दिन असेही म्हणतात. हे पहिले वैशिष्ट्य आहे.

Breaking : पिंपरी-चिंचवडकरांनो उद्या पाळा 'जनता कर्फ्यू'

पौर्णिमेचे दुसरे महत्त्व 
आषाढ पौर्णिमेचे दुसरे महत्त्व म्हणजे सिद्धार्थ गौतम २८ वर्षांचा झाला आणि शाक्य संघ व कोलीय यांच्यात रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून झगडा सुरु झाला. शाक्य संघाने कोलींयांविरुद्ध युद्ध करण्याचा संघाच्या बैठकीमध्ये ठराव पास झाला. त्या ठरावाला सिद्धार्थ गौतमाने विरोध केला व तंटा प्रेमाने, शाक्यांची दोन माणसे व कोलीयांची दोन माणसे अशा चार माणसांनी एक माणूस निवडून, एकूण पाच माणसांच्या कमिटीने मिटवावा असा ठराव मांडला. परंतु सिद्धार्थ गौतमाच्या ठरावाला कोणीही पाठिंबा दिला नाही.  सिद्धार्थ गौतम संघाच्या ठरावाच्या विरोधात गेला. अशा सदस्याला शिक्षा ठरलेली होती. त्या नियमाप्रमाणे संघाने सिद्धार्थ गौतमासमोर पुढीलपैकी शिक्षेचे तीन पर्याय सुचविले -
१) देहदंड
२) आई-वडिलांची मालमत्ता जप्त  किंवा
३) कुटुंबावर सामाजिक बहिष्कार
आणि एक पर्याय ठेवला तो सैन्यात भरती होऊन युद्धास तयार होणे.

भाजपमध्ये पिंपरी-चिंचवडचा ठसा; सात शिलेदारांची नियुक्ती करून साधला समतोल 

सिद्धार्थ गौतम संघाला विनंती करीत म्हणाला, 'हे माझ्यामुळे घडले आहे. त्याची शिक्षा मलाच भोगू द्या. माझ्या कुटुंबाची मालमत्ता जप्त करू नका. त्यांच्या उपजीविकेचे ते साधन आहे. आणि कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांना मानसिक त्रास देऊ नका, कारण ते निरपराध आहेत. अपराधी मीच आहे.' सेनापती म्हणाला, 'परंतु तुला मृत्यूदंड किंवा देशत्यागाची शिक्षा दिली आणि कोशलाधिपतीस ते माहीत पडले, तर तो संघाला जाब विचारील.' तेव्हा  सिद्धार्थ गौतम म्हणाला, "हीच अडचण असेल, तर मी स्वतःच परिव्राजक होऊन हा देश सोडून जातो. मग तर झाले ? संघाला अडचण येणार नाही." संघाला हा तोडगा पसंत पडला आणि सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला. त्या दिवशी आषाढी पौर्णिमा होती. भारद्वाज ऋषींच्या आश्रमात प्रव्रज्जा घेतली तो आषाढी पौर्णिमेचा दिवस होता. इ. स. पूर्व ५३४ ला रोहिणी नदीच्या पाण्याच्या झगड्यावरुन गृहत्याग केला. त्या दिनास महाभिनिष्क्रमण दिन असेही म्हणतात. (महानामकडून वस्त्र व भिक्षापात्र दान)

लॉकडाउनचा पिंपरी-चिंचवड शहराला असा झाला फायदा, हे झाले महत्त्वाचे बदल

पौर्णिमेचे तिसरे महत्त्व
गृहत्याग केल्यावर वेगवेगळ्या गुरुंच्या आश्रमात ज्ञान संपादन केल्यावर वयाच्या ३५ व्या वर्षी इ. स. पूर्व ५२८ ला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गया येथे सम्यक संबोधी प्राप्त झाल्यावर सात आठवडे तथागत आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा आनंद घेत होते. आठव्या आठवड्यात हे ज्ञान कोणाला द्यावे असा विचार करीत असता त्यांच्या समोर ब्रह्मसहंपती उभा राहतो आणि सम्यकसम्बुद्धाला विनंती करतो की, "बुद्धाचा जन्म झाला अशी वार्ता जगभर पसरली आहे. आपण बुद्ध झालात, भगवान बुद्ध झालात. आपण जगाला अंध:कारातून मुक्त केले पाहिजे. आपण हे कसे नाकारु शकता ?" तेव्हा ब्रह्मसहंपतीची विनंती मान्य करून तथागत हे ज्ञान मानवास देण्यास तयार झाले. 'आपल्या धम्माचा पहिला उपदेश कोणाला देऊ ?' असा विचार त्यांच्या मनात आला.
 
भगवान बुद्धांना आलारकालामांची आठवण झाली. ते विद्वान, शहाणे, बुद्धिमान आहेत. त्यांना धम्म उपदेश करावा, असे त्यांनी ठरविले. परंतु ते मृत्यू पावले होते, असे त्यांना समजले. नंतर उदकरामपुत्त याला शिकवावे असे योजिले. परंतु तोही मृत्यू पावला होता. त्यानंतर त्यांना आपल्या पाच मित्रांची आठवण झाली. कौंडिण्य, वप्प, महानाम, भद्दीय, आणि अश्वजित अशी पाच परिव्राजकांची नावे आहेत. त्यांनी आपली तप काळात फार सोय केली आहे. मी माझा पहिला उपदेश त्यांना का देऊ नये ? असा विचार केला. त्यांची चौकशी केली असता ते सारनाथ येथे मृगदायवन ऋषीपत्तन येथे आहेत, असे समजले. तथागत तात्काळ तिकडे निघाले. त्या पांच परिव्रजकांनी दुरून भगवंतांना पाहिले आणि ते ढोंगी आहेत, आपण त्यांचा आदर सत्कार करायचा नाही, असा विचार त्यांनी केला. परंतु जसजसे भगवान बुद्ध जवळ आले, तसे त्यांच्यापैकी एकजण उठला आणि त्यांचे भिक्षापात्र घेतले. एकाने चीवर घेतले, एकाने आसन तयार केले, एकाने पाय धुण्यासाठी पाणी दिले आणि पाचही जणांनी त्यांना वंदन केले. त्यांनी एकमेकांची खुशाली विचारली. तथागताने आपली ओळख करुन दिली व आपणास ज्ञान प्राप्ती झाली आहे, असे सांगून त्या पाच परिव्राजकांना आपल्या धम्माचा उपदेश केला व धम्मचक्र प्रवर्तित केले. त्या दिवशी आषाढ पौर्णिमा होती. या पौर्णिमेला सारनाथ येथे आपला धम्म उपदेश करून जीवनमार्ग जन्माला घातला. त्या दिनाला धम्म उदय दिन म्हणतात. ज्या ऋषीपत्तन स्थळी अनेक ऋषीमुनींचे पतन झाले, अशा स्थळी भगवान बुद्ध विजयी झाले, हे तिसरे महत्त्व आहे.

पौर्णिमेचे चौथे महत्त्व
भगवान बुद्धांनी भिक्षुंसाठी पावसाळ्याचे तीन महिने त्रास होऊ नये यासाठीच वर्षावास जाहीर केला. भिक्षूने तीन महिने कुठेतरी विहारात, चैत्यस्तूपात आपला वर्षावास करावा. स्थानिक उपासक- उपासिकांना धम्म उपदेश करावा. वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे निवास, निवारा.  भगवान बुद्धाने आपला पहिला वर्षावास सारनाथ येथील ऋषीपत्तन येथेच केला. त्यांनी आपल्या जीवनात एकूण ४६ वर्षावास केले. शेवटचा वर्षावास वैशाली येथे केला. याच पौर्णिमेला भगवान बुद्धांनी साठ भिक्षुंचा समूह झाल्यावर संघाची स्थापना केली. अशा कारणांनी  आषाढ पौर्णिमा महत्त्वाची आहे. जगात या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पौर्णिमेपासून तीन महिने प्रत्येक बुद्ध विहारात प्रवचन मालिकांचे आयोजन करावे. उपासक-उपासिकांनी धम्मज्ञानाचा लाभ घ्यावा. सर्वांचे कल्याण होवो !

कार्यक्रमाचे आयोजन पंचशील मंडळाचे अध्यक्ष दिलीप रणपिसे, चंद्रकांत गायकवाड, भय्यासाहेब भागवत, शांताराम क्षीरसागर, पार्वती सूर्यवंशी यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com