PCMC
PCMC

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर 'महिलाराज'; चार समित्यांच्या सभापतीपदीही महिलाच

पिंपरी : उपमहापौरपदी हिराबाई घुले यांची बिनविरोध निवड झाली. महापालिकेच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदाच समांतर कालावधीसाठी महापौर आणि उपमहापौपदी महिला विराजमान झाल्या आहेत. जैवविविधता समितीसह अन्य सहा विषय समित्यांपैकी चार समित्यांच्या सभापतीपदीही महिलाच आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी उद्योगनगरीच्या विकासाचा सुकाणू महिलांच्या हाती आहे.

शहराच्या महापौरपदाची सूत्रे सत्ताधारी भाजपच्या उषा ढोरे यांनी २२ नोव्हेंबर २०१९ रोजी स्वीकारली. त्या वेळी उपमहापौरपदी तुषार हिंगे विराजमान झाले. मात्र, पक्ष नेतृत्वाने गेल्या ऑक्टोबर महिन्यात राजीनामा घेतला. त्यानंतर केशव घोळवे यांना भाजपने संधी दिली. त्यांनी अवघ्या चार महिन्यात राजीनामा दिला. त्यामुळे मंगळवारी निवडणूक होऊन घुले उपमहापौर झाल्या. विशेष म्हणजे, या निवडणूक प्रक्रियेच्या पीठासन अधिकारीही महिलाच (रूबल अग्रवाल) होत्या.

तेवीस वर्षांनी पुनरावृत्ती
महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा समांतर कालावधीसाठी १९९७-९८ मध्ये महापौर आणि उपमहापौपदी महिला विराजमान झाल्या आहेत. यात महापौर अनिता फरांदे आणि उपमहापौर रेखा गावडे यांचा समावेश होता. १३ मार्च १९९७ ते २० मार्च १९९८ असा त्यांचा कालावधी होता. आता या घटनेची पुनरावृत्ती उषा ढोरे व हिराबाई घुले यांच्या रुपाने झाली आहे. यापूर्वी मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, मोहिनी लांडे, शकंतला धराडे यांनी महापौर तर, विश्रांती पाडाळे, मंगला जाधव, उषा ढोरे, झामाबाई बारणे, शैलजा मोरे यांनी उपमहापौर म्हणून काम पाहिले आहे. यातील केवळ ढोरे यांना दोन्ही पदांवर काम करण्याची संधी मिळाली आहे.

महिलांची अभिनंदन सभा
उपमहापौरपदाची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर पीठासन अधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवक सभागृहातून बाहेर पडले. केवळ नगरसेविका सभागृहात थांबल्या होत्या. यात सत्ताधारी भाजपसह विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि अपक्ष नगरसेविकांचा समावेश होता. नवनिर्वाचित उपमहापौर हिराबाई घुले व महापौर उषा ढोरे व्यासपीठावर उपस्थित होत्या. ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी घुले यांचे अभिनंदन केले. ‘आता माई (उषा ढोरे) व नानी (हिराबाई घुले) यांनी शहराचे नेतृत्व करायचे आहे,’ असे म्हणून दोघींना शुभेच्छा दिल्या. आणि सभेच्या कामकाजाप्रमाणे महापौर ढोरे यांनी प्रत्येक नगरसेविकेचा नामोल्लेख करीत बोलण्याची संधी दिली.

नगरसेविकांनीही हात वर करून बोलण्याची परवानगी मागितली. यात माजी उपमहापौर शैलजा मोरे, झामाबाई बारणे, आशा शेंडगे, सुवर्णा बुर्डे, निर्मला गायकवाड, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, उषा मुंढे, सुजाता पालांडे यांचा समावेश होता. माजी महापौर मंगला कदम यांनी व्यासपीठावर जाऊन अभिनंदन केले. अन्य नगरसेविकांनीही व्यासपीठावर जाऊन अभिनंदन केले. आगामी निवडणुकीत आपण सर्व जणी विजयी होऊन पुन्हा या सभागृहात येऊ अशा शब्दांत मोरे यांनी आशावाद व्यक्त केला. राष्ट्रवादीचे उमेदवार पंकज भालेकर यांनी माघार घेऊन एका महिलेची बिनविरोध निवड होऊ दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानून नगरसेविकांना शुभेच्छा दिल्या.

विषय समित्यांवर ‘महिलाराज’
महापालिकेच्या स्थायी समितीसह वेगवेगळ्या सहा विषय समित्या आहेत. त्यातील विधी समितीच्या अध्यक्षा स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समिती अध्यक्षा प्रा. सोनाली गव्हाणे, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा चंदा लोखंडे, शिक्षण समिती अध्यक्षा मनीषा पवार, जैवविविधता समिती अध्यक्षा उषा मुंढे आहेत. केवळ स्थायी समिती (ॲड. नितीन लांडगे) आणि क्रीडा- कला- साहित्य व सांस्कृतिक समिती (प्रा. उत्तम केंदळे) अध्यक्षपद पुरुषांकडे आहे.

- पिंपरी-चिंचवडमधील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com