
हेल्थ कार्ड न देता रुग्णांना चिठ्ठीवर माहिती लिहून दिली जात आहे. त्यावर टोकन क्रमांक व खोली क्रमांक नोंदवला जात आहे. संबंधित रुग्णाचे नाव व डॉक्टरांच्या नावाचा उल्लेख केला जात आहे.
पिंपरी - यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्व रुग्णांची माहिती डिजिटल स्वरूपात ई-हेल्थ कार्ड प्रणालीमध्ये जतन केली जाते. २०११ सालापासून ‘अमृता टेक्नॉलॉजी’ कंपनीकडे या कार्डचे काम आहे. मात्र, बिल रखडल्याने कंपनीने रुग्णांना ई-हेल्थ कार्ड सेवा १५ दिवसांपासून बंद केली आहे.
या प्रणालीमुळे अचूक निदान, वैद्यकीय उपचार, रुग्णांचा वैद्यकीय इतिहास जतन करणे सोपे आहे. ही सेवा पूर्ण ऑनलाइन आहे. डॉक्टरांच्या बदल्या झाल्या किंवा कित्येक वर्षानंतरही रुग्ण उपचारासाठी आल्यास पहिल्यांदा डॉक्टर हेल्थ कार्ड विषयी विचारणा करतात. त्यामाध्यमातून रुग्णांची पूर्व माहिती मिळते. त्यानंतर पुढील उपचार दिले जातात. त्यामुळे रुग्णांना ढिगभर कागदपत्रे जवळ बाळगावी लागत नाहीत. वेळेची बचत होते. सुरुवातीला नवीन कार्ड काढताना ३० रूपये आणि नंतरच्या उपचारासाठी दरवेळी दहा रूपये केसपेपरसाठी घेतले जातात.
शहरातील नागरिकांना वर्षभर दिवसाआडच पाणी
रुग्णांनी वेळोवेळी केलेले सीटी स्कॅन, महिलांची प्रसूती, एमआरआय, सोनोग्राफी, लघवी व रक्ताचे नमूने, औषधांसह माहिती यामध्ये समाविष्ट केली जात आहेत. आंतररुग्ण विभागासाठी सध्या ही सेवा सुरु आहे. शिवाय याचा डॅशबोर्डही काही दिवसांनी रुग्णांना पाहता येणार आहे. ई-मेल व एसएमएस सेवा यामाध्यामातून दिली जाणार होती. महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये देखील ही सेवा देण्याचा प्रयत्न होता. मात्र, हे अद्यापर्यंत दिले गेले नाही. या प्रणालीची व्याप्ती देखील भविष्यात वाढविण्याचे ठरले होते. मात्र, आरोग्य विभाग व वायसीएम प्रशासनाच्या निरूत्साही धोरणामुळे रुग्ण सेवेपासून वंचित राहत आहेत.
पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
सद्यःस्थिती
हेल्थ कार्ड न देता रुग्णांना चिठ्ठीवर माहिती लिहून दिली जात आहे. त्यावर टोकन क्रमांक व खोली क्रमांक नोंदवला जात आहे. संबंधित रुग्णाचे नाव व डॉक्टरांच्या नावाचा उल्लेख केला जात आहे. मात्र, या अपुऱ्या सुविधेमुळे हेल्थ कार्ड खिडकीतील कर्मचाऱ्यांनाही कामकाज सुचेनासे झाले आहे. तेच काम पुन्हा करावे लागणार आहे. खिडकीतील कर्मचारी कार्ड बंद असल्याचे रुग्णांना सांगत आहेत. तेथील एक कर्मचारी म्हणाला, ‘कार्ड सुरू झाले की प्रिंट करून देऊ.’
२०१८ नंतर वर्क ऑर्डर मिळाली नाही. आत्तापर्यंत १ लाख ६१ हजार हेल्थ कार्ड पुरविले आहेत. दहा वर्षे होत आली सेवा देत आहोत. महापालिकेने जेवढी सांगितली होती ती ऑर्डर पूर्ण झालेली आहे. आम्हाला मान्यता न मिळाल्याने सेवा देणे बंद केले आहे. थकलेल्या बिलांबाबत मी नाही सांगू शकत.
- अवंती लोहार, अमृता टेक्नॉलॉजीज, ठेकेदार