Pune- भाजप म्हणते टिळक आणि भाजपमध्ये वैचारिक नातं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप म्हणते टिळक आणि भाजपमध्ये वैचारिक नातं

भाजप म्हणते टिळक आणि भाजपमध्ये वैचारिक नातं

पुणे - लोकमान्य टिळक आणि भाजपमध्ये वैचारिक नातं असल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत. याबाबत भाजपच्या काही नेत्यांना छेडलं असता त्यांनी काही उदाहरणे देत या दाव्याचे समर्थन केले आहे. 

कसब्याच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षानं कै. आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांपैकी कुणाला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना दिली आहे. त्यावरून भाजपवर टीकाही झाली होती. याबाबत भाजपच्या काही नेत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या दाव्याचं समर्थन केलं. (BJP Claiming ideological links with Lomanya Tilak)

याबाबत माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारले असता ते म्हणाले,लोकमान्य टिळक यांचा वारसा काँग्रेस पेलूच शकत नाही. लोकमान्यांच्या तेजस्वी राष्ट्रीय बाण्याचे मोल केवळ भाजपाच जाणतो. लोकमान्यांच्या विचारांशी असलेलं नातं भाजपनं निवडणुकीच्या पलीकडं जपलेलं आहे, असंही मोहोळ यावेळी म्हणाले. 

टिळक आणि भाजप हे नातं केवळ राजकारणापुरतं मर्यादित नाही. त्याला खूप व्यापक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, असं भाजपा पुणे शहराचे सहप्रचार प्रमुख हेमंत लेले म्हणाले. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रविचाराशी भाजपची वैचारिक नाळ आहे. लोकमान्यांचा तो प्रखर वारसा स्वातंत्र्योत्तर काळात पुढे नेण्याचं काम आज भाजप करत आहे, असाही दावा लेले यांनी केला. प्रखर आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा मुद्दा लोकमान्य टिळकांनी मांडला. लोकमान्यांच्या विचारविश्वातील हा मुद्दा भाजपाने आपल्या वैचारिक तत्त्वज्ञानातला महत्त्वाचा भाग बनवला, असाही दावा या नेत्यांनी केला.

१९८४ मध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी लोकसभेतले विरोधी पक्षनेते असताना त्यांना टिळक पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. कै. जयंतराव टिळक त्यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते.  तर तृतिय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनाही हा पुरस्कार देण्यात आला होता. राष्ट्रवाद,राष्ट्रीय विचार,स्वदेशीचा विचार मांडणार्‍यांना प्रामुख्यानं टिळक पुरस्कार दिला जातो. त्यात कै. वाजपेयी आणि देवरसांचा समावेश असणे,हा टिळक आणि भाजपाच्या वैचारिक नात्यातील महत्त्वाचा दुवा आहे, असाही दावा या नेत्यांनी दावा केला.

भाजपचे नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांनी काढलेल्या सुवर्णजयंती रथयात्रेच्या वेळी टिळक वाड्याला भेट दिली होती.‘भारतीय स्वातंत्र्याच्या समराचा आवाज बुलंद करणार्‍या लोकमान्यांना त्यांच्या कर्मभूमीत येऊन वंदन करण्यात मला अधिक समाधानाची भावना असल्या’चे उद्‌गार आडवानींनी काढले होते. त्यामुळं टिळक केवळ काँग्रेसचेच हा केला दावा चुकीचा असल्याचे या नेत्यांनी सांगितले.  

टिळक परिवारातील मुक्ता टिळक यांनी भाजपात प्रवेश केल्यावर त्यांना नगरसेवक आणि आमदारपदाची संधी पक्षानं दिली.पुण्यात महिला महापौर होण्याची संधी मिळाल्यानंतर भाजपाने मुक्ता टिळक यांची त्या पदासाठी निवड केली, अशीही पुस्ती या नेत्यांनी जोडली.