स्वराज्याचं स्वप्न, सळसळणार रक्त आणि महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास. हा इतिहास वाचताना, ऐकताना आणि गोष्ट स्वरूपात बघताना अंगावर काटा येतोच मात्र ‘छावा’ बघताना याचीच कमतरता भासते. आत्तापर्यंत मराठीत अनेक चित्रपट आणि मालिकांमधून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं शौर्य आपण पाहिलाय मात्र हिंदीत त्याचं बदललेलं हे स्वरुप बघताना मराठ्यांचा इतिहास बघत असल्याची भावनाच उरत नाही.
शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या पुस्तकावर आधारित छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास 'छावा' या हिंदी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर साकारण्यात आलाय. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून भव्यतेने मोठ्या बजेटसह तो मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. चित्रपटात उत्तम कलाकार, हटके संवाद, भव्य लढायांचे दृश्य, ए आर रहमान यांचं संगीत सगळं काही आहे पण कुठेतरी चित्रपटाचा आत्मा हरवल्याचं जाणवतं. सुरुवातीपासूनच चित्रपटात त्रुटी जाणवतात मात्र चित्रपटाचा क्लायमॅक्स स्तब्ध आणि अवाक करतो. चित्रपटाच्या शेवटाला प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहणार नाही. औरंगजेबने शंभू राजांना यातना देऊनही स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगुन शेवटपर्यंत राजे कसे लढत राहिले हे या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये लक्ष वेधून घेणारं ठरतं. चित्रपटाची शेवटची काही मिनीटे स्तब्ध करणारी आहेत आणि आपल्या राजाचं शौर्य आणि बलिदान किती मोठं होतं याचं अभुतूपूर्व आणि अंगावर काटा आणणारं चित्रण झालय.