
Marathi Entertainment News : हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापारही प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात यशस्वी झाला. युएई - जीसीसी प्रदेश, युके येथे या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि तो त्या भागात सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. स्पेन मधे तर फसक्लास दाभाडेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी सिनेमा रिलीज झाला. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट अमेझॉन प्राईमवरही प्रदर्शित झाला आणि पहिल्याच आठवड्यात संपूर्ण भारतात बघितल्या जाणाऱ्या पहिल्या तीन चित्रपटांमधे जाऊन पोहोचला. ओटीटीवर हा चित्रपट उत्तमरित्या चालत असतानाही अनेक प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहण्याला पसंती दर्शवली आणि आता आज हा चित्रपट सिनेमागृहात यशस्वी अर्धशतक साजरे करत आहे.