

garambicha bapu new movie
esakal
कोकणची माती अशी की, ती फक्त भात पिकवत नाही, तर माणसंही घडवते. आंबा-फणसाच्या दाट राईतून, माडा-पोफळींच्या सावलीतून आणि खाडीच्या खारट वाऱ्यातून एक अवखळ, बेभान आणि तितकंच निखळ आयुष्य इथं फुलतं. हर्णै, मुरुड, आंजर्ले, मुर्डी या समुद्रकिनाऱ्यांपासून वर दापोलीपर्यंत पसरलेल्या याच त्रिकोणी प्रदेशात वसलंय एक गाव म्हणजे गारंबी. याच गारंबीत जन्माला येते एक गोष्ट, जी काळाच्या पडद्याआड जात नाही, उलट पिढ्यानपिढ्या तितकीच ताजी राहते ती म्हणजे "गारंबीचा बापू". गुरुप्रसाद फिल्म्स आणि विषय प्रॉडक्शन्स यांच्या बॅनरखाली निर्मिती केलेला हा चित्रपट दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी नव्या तंत्रज्ञानाची जोड देत नव्या रूपात साकारला आहे.