सध्या बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा आहे. हे चित्रपट मराठीसोबतच हिंदी चित्रपटांवरही वरचढ ठरत आहेत. त्यात अनेक मराठी कलाकार हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसतायत. आता काही मराठी कलाकारा थेट दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाले आहेत. अभिनेते प्रवीण तरडे आता 'अहो विक्रमार्का' या दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे. ते या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहेत. आता त्यांच्या पाठोपाठ आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीची या चित्रपटात एंट्री झाली आहे.
लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाचे सशक्त पैलू उलगडून दाखविले आहेत, प्रत्येक भूमिकेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री आता ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य अॅक्शनपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून या चित्रपटात वीरांगणा 'भवानी' ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत आहे. दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा यांच्या आगामी ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत ‘अहो विक्रमार्का’ मराठी व्यतिरिक्त इतर ५ भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना तेजस्विनी सांगते की, ‘कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करताना कलाकारांसाठी त्यातील आव्हान ही सुखावह असतात. त्यातही आपली मातृभाषा नसलेल्या इतर चित्रपटांमध्ये काम करताना हे आव्हान अधिक कठीण असते. ‘अहो विक्रमार्का' चित्रपटात सगळ्यात मोठं भाषेचे आव्हान होते कारण केवळ भाषा नव्हे तर त्याचं व्याकरण सुद्धा समजून घ्यावं लागतं. मला माझ्या संवादात प्रत्येक शब्दामागील अर्थ आणि लहेजा समजून-उमजून भूमिका करावी लागत होती. साऊथचे सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ वेळेबाबतीत प्रचंड शिस्तप्रिय आहेत. त्यांचा साधेपणा मला खूप भावला. आजवर माझ्या वेगवेगळ्या भूमिकांना प्रेक्षकांनी मला चांगला प्रतिसाद दिला असून ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटातील माझ्या भूमिकेचं प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील याची मला खात्री आहे.
हा दाक्षिणात्य सिनेमा असला तरी तो मराठीत देखील प्रदर्शित होणार आहे. आता दाक्षिणात्य आणि मराठी कलाकार चित्रपटात काय कमाल करतात? हे पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'अहो विक्रमार्का’ चित्रपटसृष्टीतील पहिला ब्लॉकबस्टर-पॅन इंडिया चित्रपट ६ भाषांमध्ये ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ‘अहो विक्रमार्का' हा पहिला मराठी चित्रपट आहे, जो एकाच वेळी मराठी आणि तेलगु या दोन भाषेत चित्रित झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.