
अक्षर वाङ्मयाची निर्मिती करणाऱ्या मेघना साने या मराठी वाचक वर्गाला सुपरिचित आहेत. त्यांचा ‘ॲडजस्टमेंट’ हा नवा कथासंग्रह नुकताच म्हणजे २०२४च्या अखेरीस डिंपल प्रकाशनने प्रसिद्ध केला आहे. कथासंग्रहाचे मुखपृष्ठ नजरेत भरते.
काळसर रंगाला हिरवट रंगाची पार्श्वभूमी आणि त्यावर एकमेकांसमोर असलेली म्हणजे जणू विरुद्ध दिशेला बघणारी स्त्री-पुरुष ही पात्रे ठळक स्वरूपात दिसत असली तरी ती शेवटी हातात हात घालून दूरवर जात आहेत हे त्यांच्या चिमुकल्या आकृतिबंधातून दिसून येते. जणू निराशाजनक नकारार्थी काळसर रंगाच्या जागी ऊर्जादायी शांत, हिरवट रंग येऊन ‘ॲडजस्टमेंट’मुळे ‘शांतता, जगणं सुरू आहे’ असेच अधोरेखित झाले आहे. पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे ती नमिता कीर यांची.