Artificial Intelligence In Sports:
आपल्या भाषेत समजावणारा गुरु असेल, तर विद्यार्थ्यांना ते आपलासे वाटतात आणि त्यामुळे त्याचा विकासही जलद गतीने होतो. पण जेव्हा दुसऱ्या भाषेत संवाद साधणारा प्रशिक्षक असतो, तेव्हा शिकवताना आणि शिकताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. भाषा हे संवादाचे महत्त्वाचे माध्यम आहे, त्यामुळेच ती समजणे आवश्यक ठरते. खेळाच्या संदर्भात सांगायचे झाले, तर पूर्वी भारतीय क्रिकेटपटूंनाही परदेशी प्रशिक्षकांशी जुळवून घेणे कठीण गेले आहे. कपिल देव, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग यांसारख्या अनेक खेळाडूंना इंग्रजी समजण्यात अडचण यायची. त्यामुळे प्रशिक्षक काय सांगतोय, हेच त्यांना अनेकदा समजत नसे. यावर उपाय म्हणून त्यांनी इंग्रजी शिकली, पण हे फक्त क्रिकेटपुरतेच!