

Annabhau Sathe journalism
esakal
अण्णा भाऊ कम्युनिस्ट चळवळीतून पुढे आले. त्यांचा वैचारिक पिंड तिथेच तयार झाला. त्यांच्या एकूणच साहित्याचे तत्त्वज्ञान मार्क्सवादी होते. त्या विचारांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. पत्रकार म्हणून त्यांनी ‘लोकयुद्ध’, ‘मशाल’ आणि ‘युगांतर’मधून खूप सारे लेखन केले. त्यातील प्रत्येक लेखनातून त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट दिसते.
ज्येष्ठ साहित्यिक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आयुष्यातील लिखाणाची सुरुवात १९४६ मध्ये झाली होती, ती एक पत्रकार म्हणून. त्या काळात त्यांनी ‘लोकयुद्ध’मधून वार्ताहर म्हणून लिखाण सुरू केले होते. मुंबईतील लोकवस्त्यांमधील कष्टकरी, कामगार यांच्या असंख्य प्रश्नांवर त्यांनी प्रत्यक्ष फिरून मांडणी केली होती. कुलाबा परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी वृत्तांकन केले होते. ते त्यांच्या पत्रकारितेतील पहिले वृत्तांकन होते. त्यापूर्वी त्यांनी माटुंगा लेबर कॅम्पमधील वस्तीत राहताना ‘मच्छराचा पोवाडा’ लिहिला होता. तेव्हा त्यांनी तो अनेक कामगारांपुढे गाऊन दाखविला. त्यानंतर त्यांच्या पोवाडालेखनाची सुरुवात झाली, असे म्हणता येईल. पुढे ‘स्टॅलिनग्राडचा पोवाडा’, ‘नानकिन नगरचा पोवाडा’ आदींचे लेखन त्यांनी केले.