esakal | सोरायसीसवर आयुर्वेदात यशस्वी उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

Ayurveda treatment is best for Psoriasis in India}

सोरायसीस या रोगावर आयुर्वेदिक चिकित्सेचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. संशोधकांना रुग्ण बरे करण्यात यश आले. काय आहे हे संशोधन? कोणती औषधे त्यांनी वापरली? या संदर्भात माहिती देणारा हा लेख...

सोरायसीसवर आयुर्वेदात यशस्वी उपचार

sakal_logo
By
राजेंद्र कृष्णराव घोरपडे

सोरायसीस या रोगावर आयुर्वेदिक चिकित्सेचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. संशोधकांना रुग्ण बरे करण्यात यश आले. काय आहे हे संशोधन? कोणती औषधे त्यांनी वापरली? या संदर्भात माहिती देणारा हा लेख...

जगभरात दोन ते चार टक्के नागरिकांना सोरायसीस हा आजार झालेला आढळतो. भारतात या आजाराचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 2.8 टक्के आहे. आयुर्वेदानुसार हा आजार हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. प्राचीन संहितांमध्ये कुष्ठरोगांतर्गत या रोगाचा समावेश केलेला आढळतो. कुष्ठरोगाचे विविध प्रकार प्राचीन ग्रंथांमध्ये विशद केले आहेत. त्या प्रकारांपैकीच सोरायसीस हा एक प्रकार मानला जातो. या प्रकारातील पाल्मोप्लांटार सोरायसीसच्या रुग्णांचे प्रमाण सुमारे पाच टक्के पाहायला मिळते.

सोरायसीस हा त्वचेला सूज येण्याचा गंभीर आजार आहे. आधुनिक विज्ञानाने या आजारावर संशोधन सुरू केले आहे. हा आजार पूर्णतः बरा होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आयुर्वेदानेही या आजारावर यशस्वी उपचार पद्धती शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. या संदर्भात डॉ. गुरुप्रसाद निल्ले, प्रा. आनंदकुमार चौधरी, डॉ. लक्ष्मीनारायण गुप्त यांचा एक शोधनिबंध नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद या संस्थेमार्फत प्रकाशित जर्नल ऑफ आयुर्वेद केस रिपोर्टमध्ये प्रकाशित झाला आहे. यात त्यांनी एका महिला रुग्णावर प्रयोग करून त्यांचा हा आजार पूर्णत बरा केला. हा आजार बरा होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला.

पण, हा आजार पूर्णतः बरा करण्यात या संशोधकांना यश आले. त्या महिलेला हा आजार पुन्हा होणार नाही, याची खात्रीही त्यांना वाटते. यामुळे सोरायसीस या रोगावर आयुर्वेदीक चिकित्सेचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. या संशोधनात डॉ. निल्ले हे प्रमुख संशोधक आहेत. डॉ. निल्ले हे कोल्हापूर जिल्ह्यातील राशिवडे येथील (कै.) डॉ. चंद्रकांत निल्ले यांचे पुत्र आहेत.

कुष्ठरोगाचे 18 प्रकार आयुर्वेदात सांगितले आहेत. त्यापैकीच एक विदारिका हा कुष्ठाचा प्रकार आहे. संशोधकांनी कुष्ठरोगासाठी आयुर्वेदिक चिकित्सेत सांगितलेल्या औषधांचा वापर तसेच अन्य काही औषधांचा वापर करून यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
हा आजार होण्याची कारणे

संशोधकांच्या मते, हा आजार कशामुळे होतो याची निश्‍चित कारणे अद्याप आधुनिक विज्ञानाने स्पष्ट केलेली नाहीत. पण, रोजची धकाधकीची आणि तणावपूर्ण जीवनशैली या आजारास कारणीभूत असल्याचे आयुर्वेदाने म्हटले आहे. आहार आणि विहारातील बदल जसे, की दूषित मीठ- मासे, प्रमाणापेक्षा अधिक मद्यपान, दुधाबरोबर खारट वा आंबट पदार्थांचे एकत्रित सेवन, जंक फूड, पचायला जड आणि रासायनिक घटकांचा अतिवापर असलेले अन्नपदार्थ यांचे नियमित प्रमाणापेक्षा जास्त सेवन हीसुद्धा सोरायसीस होण्यामागची प्रमुख कारणे आहेत.

ही आहेत आजाराची लक्षणे

- त्वचा लाल होणे
- वाळलेल्या त्वचेमुळे खाज सुटणे
- त्वचेला चिरा पडणे, त्वचा सलणे
- कधी-कधी त्या चिरातून रक्तस्राव होणे

शरीराच्या विशिष्ट भागापासून या रोगाची लक्षणे हळूहळू पूर्ण शरीरावर दिसू लागतात.
 
सोरायसीसवर वापरल्या जाणाऱ्या औषधी

1. कैशोर गुग्गुळ्ळ
2. गंधक रसायन
3. खदिरारिष्ट
4. महातिक्‍तक घृत
5. पटोल कटू रोहीन्यादी क्वाथ
आदी औषधी या रोगावर कार्यरत होत असल्याचे सिद्ध होते, असे या संशोधनात म्हटले आहे.

जखमेवर लावायची औषधे

1. विनसोरिया ऑईल
2. पंच वल्कल क्वाथ... जखम धुण्यासाठी
 
सोरायसीसग्रस्त महिलेला केले बरे

संशोधकांनी वाराणसी येथील चिकित्सा विज्ञान संस्थेच्या "बीएचयू'चे सर सुंदरलाल चिकित्सालयात रुग्णाची पाहणी केली. रामनगर येथील एका महिलेला सोरायसीसचा आजार एक वर्षापूर्वी झाला होता. तिने अनेक ठिकाणी औषधे घेतली. पण, त्याचा तात्पुरता परिणाम या जखमांवर होत होता. मात्र, हा आजार पूर्णतः बरा झाला नाही. संशोधकांनी या महिला रुग्णावर आयुर्वेदानुसार उपचार केले. अवघ्या सहा महिन्यांत हा आजार पूर्ण बरा करण्यात या संशोधकांना यश आले. त्यानंतर पुन्हा गेले वर्षभर या महिलेला हा आजार पुन्हा न झाल्याचेही संशोधकांना आढळले. यामुळे ही उपचार पद्धती या आजारावर उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. 
 
 

go to top