

Prahar Yuvashakti
esakal
काही डॉक्टर मित्रांनी आम्हाला सांगितलं, ‘तुम्ही जर दिव्यांगांसाठी मोठ्या प्रमाणात काम केलंत, तर हजारो आयुष्यं उभी राहतील.’ याच वाक्यातून एका ऐतिहासिक सेवा-यज्ञाची बीजं रोवली गेली. आम्ही ठरवलं, की दिवाळीला फक्त दिवे न लावता दिव्यांगांच्या, शेतकरी, शेतमजुरांच्या, गरजवंतांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवायचा... मग एक स्वप्न पाहिलं, संपूर्ण महाराष्ट्रासाठी निशुल्क कृत्रिम अवयव शिबिर घ्यायचं...
ही लढे हे माइकसमोर उभं राहून घोषणा दिल्यावर सुरू होत नाहीत. ते वेदनांमधून, अन्यायातून आणि मातीशी केलेल्या नात्यातूनच जन्माला येतात. आम्ही आज जिथे उभे आहोत, तो प्रवास सत्तेच्या दालनातून झालेला नाही. तो शेतातल्या मातीमधून, झोपडीच्या राखेतून आणि दिव्यांगांच्या डोळ्यातून ओघळलेल्या अश्रूंमधून झाला आहे.
शेतकरी, आदिवासी आणि दिव्यांग - हे शब्द आकड्यांत मोजता येत नाहीत. हे या देशाच्या मुळाशी जोडलेलं जगणं आहे.
त्यांच्या हातात माती असते, पायात कष्ट असतात आणि मनात एकच प्रश्न असतो - आपण या देशात माणूस म्हणून जगणार आहोत का नाही? आपलं माणूस म्हणून जगणं समाजाला मान्य आहे की नाही? आमच्या आयुष्यातील संघर्ष, आंदोलन, सेवा हे कुठल्याही राजकीय गणितातून उभं राहिलेलं नाही. ते अन्याय पाहून गप्प न बसण्याच्या हट्टातून उभं राहिलं आहे.