

Ardha Dafan Andolan 2003
esakal
आम्ही आदिवासी शेतकऱ्यांसोबत अर्ध-दफन करून आंदोलनाची सुरुवात केली आहे, याची वार्ता संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे लोकांची गर्दी वाढत गेली. पत्रकार आले. टीव्ही कॅमेरे लागले. आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात धगधगू लागलं. लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या... मग प्रशासन हादरलं आणि अखेर सर्व मागण्या मान्य झाल्या.
लमंडईचा आक्रोश आणि आमच्या राजकीय आयुष्यात कायमचा ठसा उमटवणारा दिवस. काही दिवस हे माणसाच्या आयुष्यात कायमचे कोरले जातात. त्यांच्या आठवणी धूसर होत नाहीत, उलट दर वेळेला जास्तच तीव्र होऊन मनात उभ्या राहतात. ८ नोव्हेंबर २००३ हा माझ्या आयुष्यातला असाच एक दिवस. त्या दिवशी बेलमंडई-नागरवाडीतील आदिवासी शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाने आमच्या मनात जे घडलं, तो फक्त संताप नव्हता; तर तो शोषितांच्या वेदना अनुभवून जन्मलेला क्रांतीचा निर्धार होता.
तसं पाहिलं तर या घटनेची बीजं काही महिन्यांपूर्वीच रोवली गेली होती. जून २००२... धोत्रा गावातील विठ्ठलराव ठाकरे यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्या केली. शेतीतून काहीच उत्पन्न नाही... कर्जाचा बोजा, कायमची तोट्याची शेती यामुळे विठ्ठलरावांनी अखेर जगण्याचा धीर सोडला. त्यांच्या आत्महत्येचा निषेध म्हणून आम्ही केलेलं मुंडन आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं. पहिल्यांदा राज्य सरकारला आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत द्यावी लागली. प्रहार युवाशक्ती संघटनेने केलेल्या आंदोलनाचं ते फलित होतं. पण, आमच्या मनात एक आवाज सतत घोळत होता, ‘हा संघर्ष इथे संपत नाही. अजून अनेक विठ्ठलराव ठाकरे आहेत, ज्यांना न्यायाची गरज आहे’ आणि ते खरं ठरलं. बेलमंडई-नागरवाडीने आमच्यासमोर आणखी मोठं युद्ध उभं केलं.