

Bangladesh elections :
esakal
दोन वर्षांपूर्वीच्या नागरी उठावानंतर बांगलादेशात आता १२ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकांत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगला बंदी घालण्यात आली असून बीएनपी, जमाते इस्लामी आणि एनसीपी या पक्षांमध्ये सामना रंगणार आहे. निवडणूकपूर्व चाचण्यांचा कल बीएनपीला स्पष्ट बहुमत मिळेल असा दिसत आहे. तारिक रेहमान यांनी लंडनहून परतल्यानंतर मांडलेली भूमिका भारताच्या दृष्टीने काहीशी दिलासादायक ठरणारी आहे; परंतु त्याचवेळी जमाते इस्लामी आणि एनसीपी या भारतविरोधी व मूलतत्ववादी पक्षांची ताकदही वाढत चालली आहे. यापैकी एकही संघटना सत्तेत सहभागी झाली तर ती भारतासाठी चिंतेची बाब ठरणार आहे.
भारताचा शेजारी असणाऱ्या बांगलादेशात १२ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. २०२४ च्या उत्तरार्धात झालेल्या जनआंदोलनानंतर बांगलादेशात १५ वर्षांहून अधिक काळ सत्तेत राहिलेल्या शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावे लागले. त्यानंतर अमेरिकेच्या वरदहस्ताने बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचे अंतरीम सरकार सत्तेत आले. युनूस यांची वर्ष-दीड वर्षांची कारकिर्द बांगलादेशच्या आर्थिक विकासाला काही वर्षे मागे घेऊन जाणारी तर ठरलीच; पण त्याहून अधिक चिंतेची बाब म्हणजे शेख हसीनांच्या कार्यकाळात भारत आणि बांगलादेशातील संबंधांनी सुवर्णकाळ पाहिला. त्या संबंधांचे रुपांतर तणावात करण्याचे काम युनूस यांनी केले. त्यामुळे या निवडणुका भारतासह दक्षिण आशियासाठी महत्त्वाच्या आहेत.