
बुद्धिबळातील विश्व विजेता मॅग्नस कार्लसनला एका स्पर्धेत डोळ्यांवर पट्टी बांधून बुद्धिबळाच्या पटावरील चाली खेळण्यास सांगण्यात आले. त्याची पहिली प्रतिक्रिया होती, 'मी असं कधी केलं नाहीये.'
खरंतर कार्लसन म्हणजे ६४ घरांचा राजाच. तो सगळा पट त्याच्या डोक्यांत एखाद्या कम्प्युटर चीप प्रमाणे घट्ट बसला असेल पण तरीही बंद डोळ्यांनी खेळायचं ही कल्पनाच त्याला कठीण वाटली.
त्यामुळेच जेव्हा दृष्टीहीन खेळाडू सहजतेने बुद्धिबळाच्या काळ्या पांढऱ्या पटावर सोंगट्या फिरवतात, ते पाहून बघणाऱ्यांचे डोळे खरंच पांढरे होऊन जातात.
आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही अशी कामगिरी हे दृष्टीहीन खेळाडू डोळ्यांशिवाय करून दाखवतात.
कसं करतात ते हे सगळं?
डोळ्यांभोवती काळाकुट्ट अंधार असताना त्यांना हा पट नेमका दिसतो तरी कसा?
तंत्रज्ञान त्यांना कशी मदत करतं?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही म्हणजे सकाळ प्लसच्या टीमने या खेळाडूंशीच संवाद साधायचं ठरवलं. त्यातून जे गवसलं ते मांडत आहोत..