

Parbhani Municipal Corporation Election
esakal
राज्यात केवळ परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा महापौर झाला. या निवडणुकीतील यश, काँग्रेसबरोबरील आघाडी यांमध्ये खासदार संजय जाधव यांची महत्त्वाची भूमिका राहिली. आहे. तसेच, मुस्लिम महापौर केल्यावरून भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्यावर टीकाही केली. या सर्व मुद्द्यांवर ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी सचिन वाघमारे यांनी संजय जाधव यांच्याशी साधलेला संवाद...
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत परभणीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मोठे यश कसे मिळवले? त्यासाठी काय रणनीती अवलंबली होती?
परभणी शहराचा व लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला, तर या ठिकाणचे मतदार शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. १९८९पासून जवळपास ३७ वर्षांच्या काळात या ठिकाणी शिवसेनेचा खासदार सातत्याने निवडून आला आहे. त्याशिवाय परभणीमध्ये २००१साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत थेट जनतेतून शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला होता. विशेषतः या मतदारसंघातून मी दोन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलो आहे. परभणीत गेल्या २५ वर्षांत आमदारही आमच्याच पक्षाचा निवडून येतो. त्यामुळे या ठिकाणच्या मतदाराशी आमची नाळ जुळलेली आहे. महापालिका निवडणुकीत मतांची विभागणी विरोधक करण्यात यशस्वी ठरत होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत हे समीकरण जुळत नव्हते. यावेळी आम्ही निवडणुकीपूर्वीपासून लक्ष घातले होते. हिंदू मतदारांसोबतच मुस्लिम व दलित मतांची एकत्रित मोट बांधली. त्यासाठी मुस्लिमबहुल भागात मतविभागणी टाळण्याच्या उद्देशाने मुस्लिम उमेदवारांना संधी दिली. त्याचा परिणाम मतदारात चांगला झाला. त्यासोबतच निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेससोबत आघाडी केली.
परभणी महापालिका निवडणुकीत भाजप व महायुतीचे मोठे आव्हान असताना काय तयारी केली होती?
परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. या ठिकाणी शिवसेना जोमाने वाढली. केवळ परभणी शहरात काही वर्षांत मुस्लिम मताचे ध्रुवीकरण केले जात होते. त्याचा फायदा शिवसेनेच्या विरोधी पक्षांना फायदा होत होता. यावेळी मी, आमदार राहुल पाटील व काँग्रेसचे नेते एकत्रित बसलो आणि मतांचे विभाजन टाळले. मुस्लिमबहुल भागात आमचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आले. आतापर्यंत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हे मतदार आमच्या पाठीशी उभे राहत होते. यावेळी महापालिका निवडणुकीतही ते आमच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याचा फायदा आघाडीला झाला.