
सेठ गोरधनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे सातवे एडवर्ड स्मारक रुग्णालय अर्थात केईएम हॉस्पिटल २२ जानेवारी रोजी शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. संस्थेच्या ९९ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून, विविध कार्यक्रमांद्वारे रुग्णालयीन सेवेच्या शतकपूर्तीचा गौरव करण्यात येणार आहे. सर्वसामान्य रुग्णांसाठी नवजीवन ठरलेल्या दोन्ही संस्थांच्या देदीप्यमान कारकीर्दीवर एक प्रकाशझोत...
डॉ. अविनाश सुपे
mailto:avisupe@gmail.com
सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजची स्थापना १९२५ मध्ये ४६ विद्यार्थ्यांसह झाली. राजे सातवे एडवर्ड स्मारक रुग्णालय (किंग एडवर्ड सातवे मेमोरियल हॉस्पिटल अर्थात केईएम रुग्णालय) १९२६ साली केवळ १०० खाटांसह स्थापन झाले.
आज शंभर वर्षांनंतर दोन्ही संस्थांनी रुग्णसेवेसाठी अक्षरशः झोकून दिले आहे. शंभर वर्षांपूर्वी वार्षिक अडीचशे पदवीपूर्व व तीनशेवर पदव्युत्तर विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेले मेडिकल कॉलेज (कोणत्याही वेळी सुमारे २२०० तरुण वैद्यकीय विद्यार्थ्यांना - पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अशा दोन्हींना वैद्यकीय प्रशिक्षण देत असलेले) आणि २२८० खाटांची क्षमता असलेले रुग्णालय रुग्णसेवा, शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात अग्रेसर आहे. नर्सिंग, व्यावसायिक आणि भौतिक थेरपी विद्यार्थी तसेच मूलभूत विज्ञानातील पदव्युत्तर आणि पीएच. डी. विद्यार्थ्यांनाही तिथे प्रशिक्षण दिले जाते.
आज २०२५ मध्ये, ४५० पेक्षा जास्त स्टाफ फिजिशियन्स आणि एक हजारपेक्षा जास्त निवासी डॉक्टरांसह हे रुग्णालय वार्षिक दोन दशलक्ष बाह्यरुग्ण आणि ९० हजार आंतररुग्णांवर उपचार करत आहे. गेले शतक, मुंबईतच नाही; तर भारतातील एक अग्रेसर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणून ख्याती असलेल्या केईएममध्ये मुंबई महापालिकेचे सहयोग आणि निधीमुळे समाजातील वंचित घटकांतील बहुतांश रुग्णांवर जवळजवळ मोफत उपचार केले जातात.