उमेश झिरपे
umzirpe@gmail.com
एप्रिल-मे म्हणजे हिमालयातील अति उंच शिखर चढायचा हंगाम. एव्हरेस्ट, कांचनजुंगा, अन्नपूर्णा अशी आव्हानं उभी करणाऱ्या शिखरांवर जिद्दीने चढाई करण्यास जगभराच्या कानाकोपऱ्यांतून आलेले गिर्यारोहक सज्ज होत असतात. हा मोसम मंतरलेला असतो. आम्हीदेखील गेल्या १३ वर्षांत हा अनुभव विविध मोहिमांच्या माध्यमांतून घेतला आहे.
गिर्यारोहण ही एक जीवनशैली आहे. फक्त शिखर चढाई म्हणजे गिर्यारोहण नाही. तो एक अनंत व निरंतर चालणारा प्रवास आहे. माझा, आमच्या संस्थेचा - गिरिप्रेमीचा हा प्रवास पाच दशकांचा आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळत, कातळकड्यांचे आव्हानं स्वीकारत आम्ही हिमालयाकडे कूच केले. मिट्ट काळ्या सह्याद्रीच्या कड्यांनी जसं आम्हाला आपलंस केलं तसंच दुधाळ, शुभ्र पांढऱ्या हिमाची दुलई पांघरलेल्या हिमालयानेदेखील तेवढंच जवळ घेतलं.