Premium|Circadian Rhythm and Biological Clock : शरीराचे अदृश्य घड्याळ... सर्केडियन रिदम

Effects of Mobile Screen on Sleep : रात्री उशिरापर्यंत मोबाईलवरील रील्स पाहण्यामुळे झोपेची वेळ पुढे ढकलली जाऊ शकते. मेंदूतील जैविक घड्याळ, मेलाटोनिन हार्मोन आणि पुरेशा झोपेचा आरोग्यावर होणारा परिणाम समजून घ्या.
Circadian Rhythm and Biological Clock

Circadian Rhythm and Biological Clock

esakal

Updated on: 

डॉ. दिलीप निकम

मोबाईल स्क्रीनवरील एकामागून एक येणाऱ्या १५ सेकंदांच्या रील्समध्ये आपल्या आयुष्याचा मोक्ष शोधणाऱ्या आजच्या पिढीकडे वेळेची इतकी श्रीमंती आहे, की रात्री बारा किंवा पहाटेचे तीन वाजले तरी मोबाईल हातातून सुटत नाही... पण मन स्वतःला सांगत राहते, की आता ही शेवटची फक्त पाच मिनिटे बघतो आणि लगेच झोपतो. हाताचा अंगठा मात्र बंडखोरी करून एका रील्सकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे घेऊन जात राहतो आणि भिंतीवरील घड्याळाचे काटे रात्र उलटून गेल्याची साक्ष देत राहतात. पहाटे केव्हा तरी थकून डुलकी लागताच सकाळची पक्ष्यांची किलबिलाट व घरकामाची लगबग सुरू होते. कुणाला कामावर जाण्याची घाई असल्याने झोप पूर्ण होत नाही. ‘टाइम इज मनी’ म्हणत जग घड्याळाच्या काट्यावर चालते. या सर्वात आपण विसरतो, की आपल्या शरीरातही एक अदृश्य घड्याळ सतत चालू असते. ते ठरवते की झोप कधी यावी, भूक कधी लागावी, शरीराचे तापमान कधी वाढावे, हार्मोन्स कधी स्रवावेत आणि पेशींनी दुरुस्तीची कामे कधी करावीत. या सर्व गीष्टींचे नियोजन हे घड्याळ करते. या साधारण २४ तासांच्या जैविक लयीला ‘सर्केडियन रिदम’ म्हणतात.

मेंदूतील छोटासा ‘टाइमकीपर’

मेंदूतील हायपोथॅलॅमस भागात असलेला सुप्राकायाझ्मॅटिक न्यूक्लियस हा पेशींचा लहानसा समूह शरीराच्या मुख्य घड्याळाप्रमाणे काम करतो. नाव मोठे असले तरी त्याचे प्रमुख काम साधे आहे - डोळ्यांतून मिळणाऱ्या प्रकाशाच्या माहितीनुसार शरीराला दिवस आणि रात्र यांमधील फरक ओळखून देणे.

सकाळचा नैसर्गिक प्रकाश मेंदूला ‘दिवस सुरू झाला’ असा संदेश देतो. त्यामुळे पेशींची जागरूकता वाढते आणि शरीर दिवसातील कामांसाठी सज्ज होते. संध्याकाळी अंधार पडल्यावर मेलाटोनिन या हार्मोनचा स्राव वाढू लागतो आणि शरीर झोपेची तयारी करते, मात्र रात्री उशिरापर्यंत तेजस्वी दिवे, मोबाईल, टीव्ही आणि संगणकाचा प्रकाश सुरू राहिला, तर मेंदूला अजूनही दिवस असल्याचा भास होऊ शकतो. केवळ मोबाईलचा प्रकाश हा एकमेव दोषी नाही, तर त्यावरील उत्तेजक मजकूर, सोशल मीडिया आणि सतत येणाऱ्या सूचना यामुळे मेंदू तल्लख राहून झोप आणखी पुढे ढकलतो. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी झोप अत्यंत आवश्यक आहे. झोपेमुळे ऊर्जा परत मिळते, स्नायूंची झीज भरून निघते आणि मेंदूचे कार्य सुधारते, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. तसेच, पुरेशा झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि हृदयविकार, ताणतणाव यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. त्यामुळे शरीर व मन ताजेतवाने ठेवण्यासाठी किमान सात ते आठ तास झोप गरजेची असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com