

Decluttering Tips for Senior Citizens
esakal
विद्या हर्डीकर-सप्रे
‘अमुक एका वस्तूची गरज लागलेली नाही गेल्या वर्षात, तेव्हा ती टाकून देऊ’ असं म्हणून आपण काही टाकलं, की तीच वस्तू नेमकी दुसऱ्या दिवशी लागते आणि मग तीच वस्तू नवीन घेण्याची वेळ येते. या अनुभवातून शहाणं होऊन की काय, आपली साठवणप्रवृत्ती वाढीस लागते. आयुष्याचा उत्तररंग दिसायला लागतो, तेव्हा हा सगळा पसारा आवरण्याची वेळ असते. ती वेळ साधली तर आयुष्य साधं आणि सोपं होत. आणि ‘चला राहू आनंदात’ या आपल्या प्रवासाचा मार्ग मोकळा होतो.
आम्ही एका आजोबा-आजींकडे जेवायला गेलो होतो. आजींनी ठेवणीतला डिनर सेट मांडला होता. घर दाखवताना दोघंही साजिऱ्या घरातल्या सुबक वस्तूंचा इतिहास आणि आठवणी सांगत होते, रसिकतेनं जगण्याचा हेवा करावा असं! पण माझं मन मात्र ठेचकाळत होतं ते त्यांच्या नाबाद नव्वद वयाचा विचार करताना. पाककृतींची पुस्तकं, डिनर सेट्स, असंख्य मसाले आणि बरण्यांनी भरलेलं स्वयंपाकघर! सजावटीच्या वस्तू, पेंटिंग्ज यांनी भरलेली दालनं आणि ऐसपैस अंगण. हा सगळा पसारा ते केव्हा आणि कसा आवरणार?