
वडापाव असो वा समोसा ‘दत्तगुरू सेंटर’मध्ये एकावर थांबता येत नाही. हातातील वडापाव संपेपर्यंत समोर तयार होणारे गरमागरम वडे पाहून मन आणखी एकाची मागणी करू लागतं. तो संपल्यावर शेजारी उकळणाऱ्या मसाला चहाचा घोट घेतल्याशिवाय तिथून निघणे केवळ अशक्यच. मोजके पदार्थ, ताजेपणा आणि स्वच्छता या त्रिसूत्रीच्या जोरावर इथले पदार्थ लोकांच्या मनात घर करून आहेत.
स्वतःला कधीच कमी लेखता कामा नये, कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं. कधीकधी चांगले गुण असूनही लोकांना त्याची किंमत कळत नाही. अशावेळी त्या लोकांपासून दूर जाणे आणि वेगळ्या ठिकाणी जाऊन आपली क्षमता सिद्ध करणे, हा त्यावर चांगला उपाय ठरू शकतो. कष्ट करण्याची आणि तग धरून राहण्याची तयारी असेल, तर परिस्थितीवर मात करता येते. सोपान लिमगुडे यांच्याही बाबतीत काहीसं असंच घडलं आणि एका यशस्वी धंद्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. गेल्या तीन दशकांच्या वाटचालीत वाशी येथील सेक्टर-६च्या मिनी मार्केटमधील ‘दत्तगुरू वडापाव आणि स्नॅक्स सेंटर’ने वाशीमधील सर्वात चविष्ट आणि प्रसिद्ध वडापाव अशी आपली ओळख निर्माण केली आहे.