

Domestic Cricket Merit vs Big State Association Bias
esakal
नुकत्याच पूर्ण झालेल्या आठवड्यात एकीकडे निवड समितीने अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी आणि नंतर होणाऱ्या एक दिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड जाहीर केली. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी आणि नंतर होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड जाहीर केली. सगळ्यांना अपेक्षा होती, की जम्मू कश्मीर संघाला पहिले रणजी विजेतेपद मिळवून देणाऱ्या अकीब नबीची निवड केली जाईल. निवड समितीने अकीब नबीची चर्चा केली पण त्याला संघात जागा दिली नाही. गेली दोन वर्षे नबी जबरदस्त गोलंदाजी करून भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडत आला आहे. सलग दोन मोसमात त्याने भरपूर बळी घेतले असूनही निवड समितीने त्याचे फक्त तोंडभरून कौतुक केले, पण संघात जागा दिली नाही. मग रणजी करंडक जिंकण्याचे आणि भन्नाट गोलंदाजी करून भरपूर फलंदाजांना सलग दोन वर्षे बाद करण्याच्या कामगिरीचे मोल ते काय, हा प्रश्न निवड समितीला विचारला जातो आहे. मुंबई, दिल्ली, तमिळनाडूसारख्या मोठ्या क्रिकेट संघटनेच्या संघाने असा खेळ करून रणजी करंडक जिंकला असता आणि कोणा अशा संघाच्या गोलंदाजाने ६० नव्हे ४० बळी घेतले असते, तरी त्याला लगेच संघात जागा दिली गेली असती, जशी अंशूल कंबोज आणि हर्षित राणाला संधी मिळाली.
दुसरीकडे टाटा आयपीएलचा २०२६चा मोसम संपत आलाय. आज अंतिम सामना रंगणार आहे आणि सारे लक्ष रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघावर आहे. ज्यांना पहिल्या १७ प्रयत्नांत आयपीएल करंडकावर नाव कोरता आले नाही, त्या आरसीबी संघाला सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल जिंकण्याचे स्वप्न खुणावत आहे. एक मात्र नक्की आहे ते म्हणजे आयपीएल रिसेटचे बटण दाबणार आहे. संघ मालक काहीसे आता भानावर आले आहेत. सामान्य कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर या ना त्या प्रकारे कुऱ्हाड कोसळणार असून संघ मालकांच्या संघ चालवण्याच्या पद्धतीही बदलणार आहेत. स्वत: आयपीएल स्पर्धेचे काही नियम कठोर होणार असून खेळाडू आणि संघ मालकांचे काही फालतू लाड बंद केले जाणार आहेत, असे समजते.