
हेमलता वाडकर
धरणांचा जिल्हा म्हणून ठाणे ओळखले जाते. मुंबईची तहान भागवणारी धरणे ठाणे जिल्ह्यात आहेत. पण धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था या जिल्ह्याची झाली आहे. जिल्ह्यातील ठाण्यासह कल्याण- डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या प्रमुख शहरांसाठी बारवी धरणाचा अपवाद वगळता पाणीपुरवठा करणारा एकही सक्षम प्रकल्प नाही. ३० वर्षांपासून काळू-शाही धरणाचा प्रकल्प कागदावर आहे.
भावली धरणातून पाणी उपसाही अजून हंड्यात पडलेला नाही. त्यामुळे एकीकडे वाढत्या शहरांची तहानही वाढत असून भविष्यात ती आणखी तीव्र होणार आहे. ठोस उपाययोजना राबविण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा ‘अमृत’ निधी पदरात पाडून घेण्यासाठी राजकीय चढाओढ लागते. पण निधीच्या या ‘अमृताचे’ रूपांतर अजूनही पाणीपुरवठ्यात झालेले नाही. त्यामुळे शहरी भागाला भविष्याची तर ग्रामीण भागाला उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या टंचाईची झळ बसू लागली आहे.