

Diwali Bonus Planning
esakal
दीपाली मुजुमदार - deepalimujumdar@gmail.com
वर्षभराच्या कष्टाचा गोड हा मेवा,
दिवाळी बोनसचा खास हा ठेवा...
चेहऱ्यावर हसू अन् मनात आनंद भारी,
सजली या आनंदाने दिवाळीची तयारी!
दिवाळी म्हटली, की डोळ्यांसमोर येतात ती दिव्यांची रोषणाई, फटाके, गोडधोड फराळ आणि नवे कपडे; पण नोकरदारवर्गासाठी या आनंदाला अधिक उधाण आणणारी एकच गोष्ट असते ती म्हणजे ‘दिवाळी बोनस.’ याचे योग्य नियोजन केल्यास दिवाळीचा आनंद द्विगुणित होऊ शकतो.
सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून दिवाळी बोनस हे सण साजरा करण्यासाठी मिळालेले अतिरिक्त पैसे नसून, ती वर्षभर केलेल्या कष्टांचे फळ आणि सणाचा आनंद द्विगुणित करणारी पर्वणी असते. सर्वसामान्य माणसासाठी दिवाळी बोनसचे महत्त्व खूप मोठे आहे. वर्षभरात महागाईशी मुकाबला करताना, संसाराचा गाडा हाकताना अनेकदा कसरत करावी लागते. अशा वेळी दिवाळीच्या तोंडावर हातात बोनसची अतिरिक्त रक्कम आल्यास सणासुदीचा खर्च भागवणे अतिशय सोपे होते. मुलांसाठी नवे कपडे, घराची रंगरंगोटी, दिवाळी पाडव्याची खरेदी आणि आप्तेष्टांना भेटवस्तू देणे या सर्व गोष्टी ताणरहित पद्धतीने पार पडतात.
बोनसची रक्कम खात्यात जमा झाली, की मनात अनेक इच्छा जाग्या होतात. एखादी प्रलंबित खरेदी करावी, कुटुंबासाठी काहीतरी खास घ्यावे, फिरायला जावे किंवा स्वतःसाठी काही खर्च करावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, या आनंदासोबतच एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला हवा, हा बोनस आजचा आनंद वाढविण्यासाठी वापरायचा, की उद्याचे आर्थिक भविष्य घडविण्यासाठीही त्याचा उपयोग करायचा? याचे उत्तर म्हणजे खर्च आणि बचत यांचा योग्य समतोल.