

US-Iran Conflict Analysis
esakal
श्रीराम पवार - shriram1.pawar@gmail.com
इराणमधील राजवटीसाठी ही अस्तित्वाची लढाई होती. राजवट टिकली. अधिक ताकदीने उभी राहिली. हे युद्धातील विद्ध्वंस जमेला धरूनही यशच. ट्रम्प यांच्या मते इराणमधील राजवट आधीच बदलली आहे, जे अमेरिकेला करायचं ते करून झालं. साहजिकच अमेरिका जिंकली आहे. पण अमेरिकेचं कोणतंही प्रमुख लक्ष्य पुरं न करता युद्ध थांबवावं लागतं. हे अमेरिका युद्ध जिंकू शकली नाही हे बोचरं वास्तव अधोरेखित करणारे.
इराणचं युद्ध निदान तूर्तास थांबलं. ते थांबताना स्वतःच्या अधिकाराविषयी आणि अमेरिकेच्या सामर्थ्याविषयीच्या अतिरेकी कल्पनांच्या भ्रमजालातून डोनाल्ड ट्रम्प यांनी खडबडून जागं व्हावं असं वास्तव दाटलं आहे. अमेरिकेला महान बनवण्याचा वायदा करून सत्तेत आलेल्या ट्रम्प यांना या युद्धातून अमेरिकेची पतच पणाला लावली आणि कधी नाही असा व्यूहात्मक झटका युद्धबंदी स्वीकारताना सहन करावा लागतो आहे. इराणनं पराभव केला नसेलही, पण युद्ध अमेरिकेनं जिंकलं नाही, हे निर्विवाद सत्य. तेच एकमेव महासत्तेचा तोरा मिरवणाऱ्या देशासाठी झोंबणारं असेल.