
अमेरिकेनं आता रणगाडे बाजूला ठेवावेत आणि ड्रोनवर लक्ष केंद्रित करावं असं मागच्या वर्षी गुगलचे माजी सीईओ आणि अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली आणि पेंटॅगॉनला एकत्र आणण्याच्या प्रयत्नांचे सूत्रधार एरिक स्किम्ट यांनी सांगितलं होतं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि लष्करी व्यूहनीती यांच्यातील समन्वयात पुढाकार घेतलेल्या या तज्ज्ञांचे बोल किती सार्थ आहेत, याची जाणीव युक्रेननं रशियावर केलेल्या या दोन देशांतील युद्धात आतापर्यंतच्या सर्वांत भीषण हल्ल्यानं जगाला करून दिली. युक्रेननं दिवसाढवळ्या रशियाच्या समस्त यंत्रणेला चकवा देत रशियन हवाई दलात जो हाहाकार माजवला, त्याची नोंद जगाच्या लष्करी इतिहासात व्हावी.
तुलनेत दुबळ्या पण रणांगणात पाय रोवून उभ्या असलेल्या युक्रेननं जगातील लष्करी महासत्ता असलेल्या रशियाला अत्यंत काळजीपूर्वक रचलेल्या ड्रोन हल्ल्याच्या चालीनं चकित केलं. हा या हल्ल्याच्या सफलतेचा एक भाग... मात्र यातून आता लष्करी मोहिमांमध्ये खास करून हवाई कारवाईत ड्रोनचा वापर परिघावरून मध्यावर येतो आहे. जे रूढ युद्धतंत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारं आहे. हजार कोटींच्या लढाऊ विमानांचा, काही लाख किमतीचे ड्रोन खुळखुळा करतं, याचं दर्शन लष्करी सामग्रीतील पारंपरिक विचारांनाही आव्हान देणारं आहे.