

E20 Ethanol Blending
esakal
भारत सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल (E20) मिश्रण करण्याचे महत्त्वाकांक्षी धोरण स्वीकारले आहे. देशाची आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करणे, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे, हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणे हे प्रमुख उद्देश आहेत. भारताने २०३०पर्यंत ‘E20’चे लक्ष्य निश्चित केले होते; मात्र त्याला गती देत हे उद्दिष्ट २०२५-२६पर्यंत साध्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक शहरांमध्ये E20 पेट्रोल उपलब्ध झाले असून वाहन उत्पादक कंपन्यांनीही त्यानुसार इंजिन तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली आहे.
इथेनॉल हे ऊस, मका, तांदूळ, ज्वारी तसेच इतर जैविक पदार्थांपासून तयार होणारे जैवइंधन आहे. पेट्रोलमध्ये त्याचे मिश्रण केल्यास जीवाश्म इंधनाचा वापर कमी होतो. भारत दरवर्षी अब्जावधी डॉलरचे कच्चे तेल आयात करतो. इथेनॉलच्या वाढत्या वापरामुळे आयातीवरील खर्चात बचत होईल. यामुळे देशाची ऊर्जासुरक्षा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. या धोरणाचा सर्वांत मोठा लाभ शेतकऱ्यांना होऊ शकतो. ऊस, मका आणि इतर धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना इथेनॉलनिर्मितीसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे. साखर कारखाने आणि डिस्टिलरींना अतिरिक्त व्यवसाय मिळत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. उसाचे अतिरिक्त उत्पादन साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीकडे वळवल्यास साखरेच्या अतिरिक्त साठ्याची समस्याही कमी होऊ शकते.