

Electronic Gold Receipt EGR
esakaL
सोन्यातील गुंतवणूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दिशेने राष्ट्रीय शेअर बाजाराने इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (ईजीआर) ही नवी व्यवस्था सुरू केली आहे. डी-मॅट खात्यातून सोन्याची थेट डिजिटल मालकी मिळवून देणारी ही प्रणाली गुंतवणूकदारांसाठी पारंपरिक सोन्याला आधुनिक पर्याय ठरू शकते. मात्र, ईजीआर, डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ईटीएफ यांतील फरक समजून घेतल्याशिवाय गुंतवणुकीचा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही.
राष्ट्रीय शेअर बाजाराने (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) म्हणजेच ‘एनएसई’ने सोन्यातील गुंतवणूक आणि व्यापार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘एनएसई’ने १८ मे रोजी इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्सच्या (ईजीआर) थेट व्यवहाराला सुरुवात केली. या उपक्रमामुळे देशातील सराफा बाजाराचे डिजिटलायझेशन आणि संघटन होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या उपक्रमाला बाजारातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, सराफा व्यवसायाशी संबंधित घटकही याला महत्त्वपूर्ण पाऊल मानत आहेत. सध्या अहमदाबाद आणि मुंबई येथे सोन्याच्या सुरक्षित साठवणुकीसाठी तिजोरी आणि संकलन केंद्रे कार्यरत आहेत. आता दिल्ली, कोलकता, चेन्नई आणि बंगळूरू या प्रमुख शहरांमध्येही तिजोरी आणि संकलन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. भविष्यात देशभरात सुमारे १२० केंद्रांचे जाळे उभारण्याची योजना आहे.