

Small scale food processing business ideas
esakal
खिशात पैसा नसला तरी कष्ट करण्याची तयारी, जिद्द, आत्मविश्वास, गोड वाणी आणि चांगला जनसंपर्क या अंगभूत भांडवलाच्या खतातून उत्तम उद्योगरूपी रोपटे लावता येते. त्यानंतर आर्थिक शिस्त व श्रमरूपी घामाच्या सिंचनातून या रोपट्याचे रूपांतर बहरलेल्या उद्योगवृक्षात करता येते. अशा या उद्योगाचा सुगंध महाराष्ट्रात सर्वदूर पसरतो. अशी शून्यातून उद्योगाची उभारणी करता येते, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सांगलीमधील राजेंद्र ऊर्फ राजा कोल्हटकर यांनी उभारलेला आइस्क्रीम कोन, इंडस्ट्रिअल चॉकलेट (चॉकलेट डीप,
चोको स्प्रे, चोको पेस्ट) आणि बटरस्कॉच नट्स उत्पादनाचा उद्योग. आइस्क्रीम कोन उद्योगातील ‘राजा’ माणसाची ही यशोगाथा...
घरात उद्योग, व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ‘एमएसडब्ल्यू’ ही पदवी संपादन केलेल्या राजेंद्र कोल्हटकर यांनी ३०-३५ वर्षांच्या त्यांच्या यशस्वी प्रवासातून ‘If there is a will, there is a way’ ही इंग्रजी म्हण प्रत्यक्ष कृतीत आणता येते, हे दाखवून दिले आहे. रॅमीन सेल्स (Ramin Sales), के अँड के चॉकलेटियर (K&K Chocolatier) आणि कोरनेट फूडस प्रा. लि. (Kornet Foods pvt Ltd) या तीन कंपन्यांच्या माध्यमातून राजेंद्र कोल्हटकर यांनी आपला मुलगा केदार कोल्हटकरबरोबर आइस्क्रीम कोन, इंडस्ट्रिअल चॉकलेट आणि बटरस्कॉच नट राज्याच्या कानाकोपऱ्यात नेण्यात यश मिळविले आहे. वर्षाला साधारण अडीच कोटी आइस्क्रीम कोनचे उत्पादन सांगलीतील त्यांच्या एका उत्पादन प्रकल्पात केले जाते. याचबरोबर काही टन इंडस्ट्रिअल चॉकलेट आणि बटरस्कॉच नटचे उत्पादन त्यांच्या दुसऱ्या प्रकल्पात होते. प्रामुख्याने ‘बी टू बी’ म्हणजे ‘बिझनेस टू बिझनेस’ प्रकारात राजेंद्र कोल्हटकर कार्यरत आहेत. वारणा, गोकूळ या नावाजलेल्या मोठ्या ब्रँडसह क्रेझी आईस्क्रीम, स्नोबॉल, पारस, ग्लॅमर, इंडिया डेअरी, मॅग्नेटा, अमृतश्री, फ्रॉस्टी, बास्कीन, जस्टटेक, ऊर्जा अशा महाराष्ट्रातील अनेक आइस्क्रीम उत्पादकांना दर्जेदार, कुरकुरीत आइस्क्रीम कोन आणि प्रत्येक कंपनीचे नाव असणारे कोनाच्या आकाराचे वेष्टण/कव्हर (स्लीव्ह) पुरविण्याचे काम ते करतात. महाराष्ट्रातील आइस्क्रीम कोन उत्पादन क्षेत्रात राजेंद्र कोल्हटकर यांचे नाव आदराने घेतले जाते. प्रामुख्याने पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, चंद्रपूर, नांदेड, नागपूर, नाशिक, अमरावती, अकोला, सांगोला, मंगळवेढा, गोवा, बेळगाव आणि कर्नाटकातील काही गावांमध्ये असणारे अनेक लहान-मोठे आइस्क्रीम उत्पादक कोल्हटकर यांचेच कोन अनेक वर्षे वापरत आहेत. आगामी काळात केवळ महाराष्ट्रातच नाही, तर मागणीनुसार देशा-परदेशातदेखील आइस्क्रीम कोन पाठविण्याची तयारी असल्याचे ते आत्मविश्वासाने सांगतात.