

Ethanol Blended Petrol in India
esakal
अरविंद रेणापूरकर - arvindrenapurkar@gmail.com
इथेनॉलच्या वाढत्या मिश्रणाने पेट्रोलचा रंग बदलणार नसला, तरी वाहनधारकांचा अनुभव बदलू शकतो. स्वच्छ इंधन, कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि उत्सर्जन घटविणे या उद्देशाने भारताने इथेनॉलकडे मोठी वाटचाल सुरू केली आहे. मात्र, उच्च इथेनॉल मिश्रण स्वीकारण्यासाठी वाहन तंत्रज्ञान सज्ज असणे आणि त्याचा अतिरिक्त आर्थिक भार ग्राहकांवर पडू न देणे, ही या संक्रमणाची खरी कसोटी ठरणार आहे.
भारतात वाहनधारकांची संख्या प्रचंड असल्याने त्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा दर हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. सार्वजनिक वाहतूक कितीही सक्षम केली असली, तरी वाढत्या लोकसंख्येपुढे ती नांगी टाकताना दिसते. अशावेळी कुटुंब नियोजनाचे ब्रीदवाक्य ‘हम दो हमारे दो’ हे वाहनांच्या संख्येलाही लागू होते. अर्थात, या संपूर्ण चर्चेचा शेवट इंधनाच्या किमतीपाशी येऊन ठेपतो. आतापर्यंत पेट्रोल दरवाढीवरून आंदोलन आणि संताप व्यक्त केला जायचा; पण आता इथेनॉल मिश्रणाने त्यात भर घातली आहे. इथेनॉल वापरणे हे गाडीच्या तब्येतीसाठी चांगले की वाईट, यावरून काथ्याकूट बऱ्याच काळापासून सुरू आहे. यासाठी विविध आकडेवारी मांडली जात आहे. आता तर इथेनॉलचे प्रमाण वाढविल्याने वरवर सुरू असलेली चर्चा तळागाळात पोहोचली आहे.