

FIFA World Cup 2026
esakal
फुटबॉलच्या जगातील सर्वात मोठा महोत्सव पुन्हा एकदा नव्या जोशात अन् अधिक भव्यदिव्य स्वरूपात सुरू झाला आहे. फिफा वर्ल्डकप २०२६ केवळ एक क्रीडा स्पर्धा राहिलेली नाही, तर तो जागतिक राजकारण, अर्थकारण आणि संस्कृतीचा महाकुंभ ठरत चालला आहे. संघांची वाढलेली संख्या, जागतिक दर्जाचे सुपरस्टार्स, विक्रमी बक्षिसे अन् महागड्या तिकिटांमुळे संपूर्ण जगाचे लक्ष फुटबॉलच्या ‘महाउत्सवी’ अध्यायाकडे लागले आहे.
जागतिक दर्जाची पॉपस्टार शकिरा हिच्या ‘Dai dai iko...’ गाण्याने फुटबॉल विश्वकरंडक २०२६ स्पर्धेची वातावरणनिर्मिती तर केली आहे; पण त्याला २०१०च्या वर्ल्डकपच्या ‘Waka Waka (This Time for Africa)’ची सर अजून तरी आलेली नाही. तरीही चार वर्षांनी होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेसाठी अवघे फुटबॉल रसिक आसुसलेले आहेत... भारतीयही सज्ज आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार ११ जूनला मध्यरात्री मेक्सिको सिटीच्या ऐतिहासिक अशा इस्टाडिओ अझटेका (Estadio Azteca) स्टेडियमवर सह-यजमान मेक्सिको व दक्षिण आफ्रिका यांच्या लढतीने फिफा वर्ल्डकप २०२६चा शुभारंभ झाला. नेत्रदीपक उद्घाटन सोहळा जगाला थक्क करणारा ठरला; पण यंदाचा फुटबॉल विश्वकंरडक अनेक अर्थाने भव्यदिव्य ठरणार आहे... कारण त्यामध्ये लढताहेत तब्बल ४८ देश आणि विजेतेपदाचा करंडक पटकावण्यासाठी एकूण सामने होणार आहेत १०४. आतापर्यंताच सर्वात मोठा विश्वकंरडक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. म्हणून स्पर्धेच्या तिकिटांनीही आधीच विश्वविक्रमी किमतीचे इमले रचले आहेत.