tree comminication
Esakal
प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com
आता माणूस कृत्रिमरीत्या अन्न तयार करू शकतो. आणि भविष्यात तो आणखी मोठ्या प्रमाणात ते करेल. पण ते अन्न तयार करायला जो पायाभूत कच्चा माल लागेल तो कुठून येणार आहे?
शिक्षक दिन नुकताच झाला. गुरुपौर्णिमेनिमित्ताने लिहिलेल्या लेखामध्ये तुम्ही माणसाचे सगळ्यांत मोठे गुरू आहात असं म्हटलं होतं. म्हणून आज हे तुम्हाला पत्र... वाचकांपैकी बऱ्याच जणांना वाटू शकतं की, काय बरळतो आहे हा? झाडांना कुठे कळतं की त्यांना पत्र लिहिलं आहे ते? म्हणजे ते असतील सजीव, पण त्यांना आपली भाषा कुठे कळते?
मध्यंतरी मी एक पुस्तक वाचलं, ‘हिडन सीक्रेट्स ऑफ ट्रीज’ नावाचं. विलक्षण, अद्भुत आणि सुंदर पुस्तक. मी ते वाचून अचंबित झालो, हरखून गेलो. मला लक्षात आलं की, आपल्या आजूबाजूला, कुंड्यांमध्ये, शेताशिवारात, सोसायट्यांमध्ये, टेकडीवर, जंगलात उभी असलेले ही हिरवी-पिवळी-जांभळी सजीवसृष्टी म्हणजे एक समांतर आणि अद्भुत जगच आहे. ज्याकडे आपण म्हणजे मानवप्राणी किती दुर्लक्ष करतो.