
Maharashtra Protests
esakal
अकरा दिवसांच्या पाहुणचारानंतर आज श्रीगणेशाला भक्त भावपूर्ण वातावरणात निरोप देतील. यंदाचा गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा केला गेला... परंतु तेव्हाच मुंबईत आंदोलनाचे वारे वाहत असल्याने गणेशोत्सव काहीसा झाकोळला गेल्याचे पाहायला मिळाले. गणेशाचा लाडका उंदीरमामाही त्यामुळे विचारात पडला. तेव्हा बाप्पानेच त्याला आठवण करून दिली, की पुढच्या वर्षी येईल तेव्हा राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्याची वेळ कुणावरच येऊ नये, हाच माझा भक्तांना आशीर्वाद...
उंदीरमामांनी स्वत:चे असे यू-ट्युब चॅनल सुरू केले. त्यावर पॉडकास्ट सुरू केले. आजकाल तसा ट्रेंड आहे. इतरांकडे प्रसिद्धीसाठी दीनवाणे बघत राहायचे, कलावंत-व्यावसायिक लेखक असू तर कामे मिळविण्यासाठी कुणाचा तरी अनुनय करायचा... पुन्हा तुम्ही किती चांगले लिहिता किंवा चांगला अभिनय करता यापेक्षा तुमचे ‘फॉलोअर्स’ किती हेच पाहिले जाते. त्यापेक्षा आजकाल लोक स्वत:चे यू-ट्युब चॅनल सुरू करतात. ते सोपे असल्याचे उगाच वाटते. त्याही पलीकडे जाऊन अमक्या-तमक्याने अगदी दोन वर्षांपूर्वी स्वत:चे ऑनलाइन असे काम सुरू केले. आज तो महिन्याला दोन लाख रुपये कमावतो. शिवाय, इन्फ्युएन्सर म्हणून सेलिब्रिटी गटात गेल्याने आता महिन्याला एखादी एक लाखाची सुपारी मारतो. कुठल्या प्रॉडक्टची, सिणम्याची जाहिरात करून देतो... असे चार-पाच लाख तर सहज कमावतो, असे ऐकलेले असते. त्यामुळे आजकाल गेलाबाजार एक गल्ली सोडून एक असा यू-ट्युबर असतो...