

AI investment bubble
esakal
एआय क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षांत पैशांचा अक्षरशः पूर आला आहे. एन्व्हिडिया (NVIDIA), ओपन-एआय, मेटा, मायक्रोसॉफ्ट, गुगल, इंटेल, ओरॅकल, एएमडी या सगळ्या कंपन्यांनी एकमेकांत गुंतवणूक केली आहे. उदाहरणार्थ, एन्व्हिडिया आपल्या चिप्स विकते, पण ओपन-एआयमध्ये गुंतवणूकही करते. मायक्रोसॉफ्ट ओपन-एआयमध्ये अब्जावधी डॉलर घालते आणि त्याच वेळी त्याच कंपनीचं उत्पादन स्वतःच्या क्लाऊडमध्ये वापरते. म्हणजेच, सगळे सगळ्यांवर अवलंबून! हे परस्पर व्यवहार जणू गोलाकार घरात राहणाऱ्या लोकांसारखे झालेत; एक भिंत तुटली, की सगळं घर कोसळू शकतं.
आज एआय इकोसिस्टिममध्ये हे ‘circular investing’ मोठ्या प्रमाणावर दिसतं. मायक्रोसॉफ्ट आणि एन्व्हिडिया या दोघांचे शेअर्स एकमेकांच्या यशावर चढतात, ओरॅकल आणि ॲमेझॉन दोघेही जीपीयू क्लाऊड विकतात आणि एकमेकांकडून खरेदी करतात. ही एक अशी स्थिती झाली आहे की एखादी कंपनी नफा दाखवते, तेव्हा तो खरा नफा आहे की फक्त या साखळीतून फिरलेला पैसा आहे हे आपल्याला कळत नाही. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे एआय चिप उत्पादन. आज एका मोठ्या डेटा सेंटरसाठी लागणाऱ्या चिप्सची मागणी इतकी वाढली, की एन्व्हिडियाच्या उत्पन्नात गेल्या वर्षभरात तीनपट वाढ झाली आहे. पण याच चिप्स विकत घेणाऱ्या कंपन्यांचं उत्पन्न एआय सेवांमधून अजून फारसं मिळालेलं नाही. म्हणजे खर्च आधी आणि फायदा नंतर आणि तो ‘नंतर’ किती लांब आहे हे कुणालाच माहीत नाही!