डॉ. श्रीकांत परांजपे
मानवी हक्कांचे पुरस्कर्ते मानले जाणाऱ्या युरोपीय आणि अमेरिकी राजकीय व्यवस्थांना प्रखर राष्ट्रवादाने आव्हान दिलेले दिसते. अमेरिकी संस्कृती ही ‘सॅलेड बाउल’ची संस्कृती मानली जाते. स्थलांतरितांची मुले, मग ते स्थलांतरित कायदेशीर असोत किंवा बेकायदा असोत, यांना अमेरिकी नागरिकत्व मिळते, याचे कारण त्यांचा जन्म अमेरिकेत झालेला असतो. ट्रम्प यांनी याच संकल्पनेवर घाव घातला आहे.
अमेरिकेबद्दल बोलताना नेहमी दोन गोष्टी सांगितल्या जातात, एक म्हणजे अमेरिका हा स्थलांतरितांचा तसेच निर्वासितांचा देश आहे. तेथे अनेक देशांतून, प्रदेशांमधून लोक आले आणि त्यांनी अमेरिकेला आपलेसे केले. त्यातील काही निर्वासित हे आपल्या प्रदेशातील जाचाला कंटाळून आले असतील तर काही भविष्य साकारण्यासाठी अमेरिकेत स्थलांतरित झाले असतील.