

जगभरात अनेक पदार्थांशी मैत्री करत आइस्क्रीमनं आपलं रूप, चव आणि अनुभव वेगवेगळ्या पातळ्यांवर बदलले. चीनमध्ये लोकप्रिय असलेल्या हनी नूडल्स आइस्क्रीमचं नाव ऐकल्यावर सुरुवातीला गोंधळायला होतं. पण जेव्हा प्लेटमध्ये मधात घोळलेल्या नूडल्सवर व्हॅनिलाचा मोठा गोळा व त्यावर स्ट्रॉबेरी किंवा मँगो सिरपचा रंगीत शिंतोडा पडतो, तेव्हा त्याची अप्रतिम चव चकित करून टाकते!
उन्हाळा सुसह्य करायचा असेल तर सोबतीला आइस्क्रीम हवंच, नाही का? भर दुपारी रखरखत्या उन्हात कामासाठी बाहेर पडल्यावर पावलं नकळत आइस्क्रीम पार्लरच्या दिशेनं वळू लागतात. मलई, रोझ, पिस्ता किंवा ड्रायफ्रूट कुल्फी असो किंवा मँगो, पिस्ता, व्हॅनिला, चॉकलेट अशा फ्लेव्हर्सचं आइस्क्रीम असो, किंवा सब्जा, शेवया नि रबडी घातलेला थंडगार फालुदा असो... थंडगार, गोड आणि खाताक्षणी जिभेवर वितळणारे, मनाला तृप्ती देणारे हे पदार्थ वय, स्थळ, काळ अशी कुठलीच गोष्ट विचारात न घेता टळटळीत उन्हात सुखाची अनुभूती देतात. अर्थात केवळ उन्हाळ्यातच नाही, तर थंडीतही आइस्क्रीम खायची मजा काही औरच आहे!