

Global South and World Politics
esakal
डॉ. अमिताभ सिंग - samitabh@gmail.com
‘ग्लोबल साऊथ’चा वाढता प्रभाव म्हणजे पाश्चिमात्य देशांना आव्हान देण्यासाठी एकत्र आलेल्या ठरावीक देशांचा समूह नव्हे. अनेक वर्षांपासून वंचित परंतु महत्त्वाकांक्षी असलेल्या देशांनी त्यांच्या संघर्षाचे राजकीय सामर्थ्यात रूपांतर करण्यासाठी केलेली ही लढाई आहे. ज्या व्यवस्थेला ही राष्ट्रे आव्हान देऊ पाहताहेत, त्याच व्यवस्थेची त्यांनाही गरज आहे. त्यामुळे या व्यवस्थेची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न हादेखील त्यांच्या संघर्षाचा भाग आहे.
‘ग्लोबल साऊथ’ ही संकल्पना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. संस्थात्मक सुधारणांच्या मागणीसाठी अनेक विकसनशील वा उदयोन्मुख देश या संकल्पनेअंतर्गत आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे प्रस्थापित महासत्ता असलेले देश ‘ग्लोबल साऊथ’चा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या संकल्पनेबाबत जगभर चर्चा होत असली तरी तिचा नेमका अर्थ काय, याबाबत मात्र एकमत दिसत नाही. भिन्न आर्थिक व राजकीय व्यवस्था, आंतरराष्ट्रीय सुरक्षाविषयक हितसंबंध आणि राजनीतिक महत्त्वाकांक्षा असलेल्या देशांचा प्रामुख्याने ‘ग्लोबल साऊथ’मध्ये समावेश होतो. आर्थिक संपत्ती, सुरक्षा व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी या विषयांवर परिणाम करणाऱ्या जागतिक सत्ताकारणाच्या प्रवाहातून वंचित राहण्याचा अनुभव या देशांनी घेतला आहे. राजनीतिक कर्तृत्व आणि जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकण्याची क्षमता या संकल्पनेच्या केंद्रस्थानी आहे. दीर्घकाळ विकासविषयक धोरणे आणि महासत्तांच्या रणनीतींचा विषय म्हणून या देशांना आता आंतरराष्ट्रीय नियमांचे निर्माते बनता येईल का? भांडवल, तंत्रज्ञान आणि ज्ञानाचा जागतिक प्रवाह ज्या अटींवर चालतो, त्या बदलता येतील का? तसेच हे देश ज्या विषमतेबाबत भाष्य करतात तीच आपल्या समाजात किंवा परस्परसंबंधांत पुन्हा निर्माण न करता त्यांना हे बदल घडवून आणता येतील का? त्यामुळे ‘ग्लोबल साऊथ’ ही संकल्पना केवळ ‘विकसनशील देश’ या संज्ञेला पर्यायी ठरू शकत नाही. ढोबळमानाने ती अल्प किंवा मध्यम अर्थव्यवस्था असलेल्या देशांसाठी वापरली जात असली, तरी ती आर्थिक उत्पन्नापुरती मर्यादित नाही; किंबहुना ती भौगोलिकही नाही. ही संकल्पना भूगोल, वसाहती इतिहास, विकासातील विषमता आणि राजकीय मागण्यांना एकत्र आणते, तरीही या सर्व आयामांना एकसारखे मानत नाही. परिणामी, तिच्या सीमा प्रशासकीय पातळीवर निश्चित होण्याऐवजी कायम वादाचा विषय राहिल्या आहेत.
‘ग्लोबल साऊथ’ ही संकल्पना सुरुवातीला अमेरिकेतील कार्ल ओग्ल्सबी यांनी प्रचलित केली. १९६९ मधील व्हिएतनाम युद्ध आणि ‘ग्लोबल नॉर्थ’च्या वर्चस्वाबाबत भाष्य करताना त्यांनी हा शब्दप्रयोग केला होता. जागतिक व्यवस्थेत विविध समाजांची असमान वर्गवारी स्वाभाविक मानणाऱ्यांच्या असंतोषाचे ते प्रतिबिंब ठरल्याने त्याचे महत्त्व वाढले. प्रतिकूल परिस्थिती ही केवळ पाश्चिमात्य पद्धतीच्या विकासापूर्वीची पायरी न मानता, ती पूर्वीपासून निर्माण झालेली समस्या म्हणून समजून घेण्याची संधी ‘ग्लोबल साऊथ’ने दिली. तथापि ‘तिसरे जग’ आणि ‘ग्लोबल साऊथ’ यांच्यातील संबंध हा केवळ शब्दांतील फरकाइतका सरळसोपा नाही. ‘तिसरे जग’ या संकल्पनेत साम्राज्यवादी राजवटीतून स्वातंत्र्य मिळविण्याची आणि शीतयुद्धातील महासत्तांच्या गटांपासून स्वायत्तता राखण्याची राजकीय आकांक्षा सामावलेली होती. कालांतराने सर्वसामान्य वापरात या संकल्पनेचा अर्थ गरिबी, अस्थिरता आणि मागासलेपणा असा मर्यादित होत गेला; मात्र ‘ग्लोबल साऊथ’ने त्यापूर्वीच्या राजकीय महत्त्वाकांक्षेतील काही भाग पुन्हा अधोरेखित केले. तसेच बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीलाही या संकल्पनेत सामावून घेतले. ‘ग्लोबल साऊथ’ची संकल्पना आज पुन्हा प्रभावी होण्यामागे आणखी एक महत्त्वाची बाब कारणीभूत आहे. ती म्हणजे त्यात गणल्या जाणाऱ्या काही देशांकडे आता औद्योगिक, तांत्रिक आणि राजनीतिक क्षमता विकसित झाल्यास ते कर्जबाजारी, कच्च्या मालाच्या आयातीवरील अवलंबित्व आणि हवामान बदलाच्या संकटांना सामोरे जात आहेत. त्यामुळे दोन्ही प्रकारचे देश ‘ग्लोबल साऊथ’मध्ये असल्याने या संकल्पनेचे विश्लेषण करणे कठीण होते; परंतु राजकीयदृष्ट्या तिचे महत्त्वही स्पष्ट होते. त्यामुळे ‘ग्लोबल साऊथ’कडे कायमस्वरूपी सदस्य देशांचा समूह म्हणून नव्हे; तर भूगोल आणि इतिहास यांच्या परस्परसंबंधातून घडलेली संकल्पना म्हणून पाहिले पाहिजे.