

Gold Silver ETF NAV change
esakal
महागाई, जागतिक अनिश्चितता आणि आर्थिक चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करताना बहुतेक गुंतवणूकदारांची पहिली पसंती सोने आणि चांदीच असते. आधुनिक काळात सोने-चांदीतील गुंतवणुकीसाठी एक्स्चेंज ट्रेडेड फंडाचा (ईटीएफ) पर्याय उपलब्ध झाला आहे. मोठ्या प्रमाणात सोने-चांदी ईटीएफमध्ये गुंतवणूक केली जात आहे. या गुंतवणुकीत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने सोने-चांदी ईटीएफची ‘एनएव्ही’ मोजण्याच्या पद्धतीत एक एप्रिल २०२६ पासून बदल होणार आहे.
हा निर्णय भारतीय गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर या विषयावर एक नजर.
भारतात सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणे हे केवळ परंपरेचा भाग नसून, ते आर्थिक सुरक्षेचे एक प्रभावी साधन मानले जाते. सोने गुंतवणुकीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या गुंतवणुकीद्वारे महागाईपासून संरक्षण मिळते. कारण वस्तूंच्या किमती वाढल्यास सोन्याचे भावही वाढतात, ज्यामुळे पैशांची खरेदीशक्ती टिकून राहते. युद्ध किंवा जागतिक मंदीच्या काळात, जेव्हा शेअर बाजार कोसळतो, तेव्हा सोन्याचे भाव वाढतात आणि आर्थिक संकटकाळात ते आधार देतात. सोने हे अत्यंत तरल (liquid) गुंतवणूक साधन आहे. ते कधीही आणि कुठेही विकून रोख रक्कम मिळवता येते. गेल्या काही दशकांत पारंपरिक थेट खरेदीव्यतिरिक्त इतर अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.