
पायात काटा गेल्यानंतर तुम्हाला काय होतं, असा साधा प्रश्न शिबिरात विचारला जाई. पायात काटा गेला की कळ येते. ती कुठे येते, तर मेंदूत. मग डोळ्यातून पाणी येतं. काटा तर पायात गेलाय, मग कळ वर मेंदूत कशी येते आणि पाणी मात्र डोळ्यात येतं अन् हात काटा काढायला पुढे सरसावतो. या सर्व क्रिया काही क्षणांत होतात. त्याच पद्धतीने समाजात कुणावरही अन्याय झाला, तरी ज्याच्या डोळ्यात पाणी येतं, तो ‘कार्यकर्ता’ आणि तो काटा काढायला मदतीला धावून जाते, ती ‘संघटना.’ अशा पद्धतीने ‘संघटना’ समजावण्याचा प्रयत्न आम्ही केला. आजही या पद्धतीचा उपयोग अतिशय प्रभावीपणे होतोय...
ज्ञानिक दृष्टिकोन वाढावा म्हणून शिबिरात प्रभू सर विज्ञान हा विषय घेत. प्रभू सर विज्ञानाचे शिक्षक होते. शिबिरार्थींच्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात यासाठी अंधश्रद्धेवर केवळ भाषणं न करता, प्रत्यक्ष आपली शरीररचना कशी आहे, हे समजावण्याकरिता शरीराचा सांगाडा प्रभू सर प्रत्यक्ष दाखवत असत. बेडकाचं विच्छेदन करून शरीरातल्या निरनिराळ्या संस्था - पचनसंस्था, श्वसनसंस्था आदिवासींना समजावून सांगत. हे बेडकाचं विच्छेदन प्रभू सर या निरक्षर आदिवासींकडून प्रत्यक्ष करूनही घेत, जेणेकरून त्यांना स्वतःला त्यातल्या प्रत्येक अवयवाचं आकलन व्हावं. सूक्ष्मदर्शक यंत्र आणि दूरदर्शक यंत्र यांचा परिचय प्रभू सरांमुळे या निरक्षरांना झाला. शरीराच्या पेशींच्या रचनेचं ज्ञान सूक्ष्मदर्शकाखाली त्यांना मिळत होतं. त्यासाठी झाडाच्या पानाचा आधार घेऊन माणसाचं शरीर कसं रक्तवाहिन्या, पेशी यांच्या जाळ्यांनी बनलेलं आहे, हे प्रभू सर अतिशय उत्कृष्टपणे समजावून सांगत.