
Sakal newspaper history
esakal
प्रतापराव पवार
editor@esakal.com
२१ सप्टेंबर! माझ्या आयुष्यातील कायमचा लक्षात राहणारा दिवस. २१ सप्टेंबर १९८५ या दिवशी मी संचालक या नात्याने प्रथमच ‘सकाळ’च्या वास्तूमध्ये प्रवेश केला. आणि लवकरच कार्यकारी संचालक म्हणून शंभर टक्के जबाबदारी स्वीकारली, अध्यक्ष या नात्याने माजी न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड हे काम पाहू लागले. ‘सकाळ’ हा आजतागायत, म्हणजे ४० वर्षे माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
या काळाचा परामर्श घेताना आठवणीचे मोहोळ उठते. काही गोष्टी पुन्हा लिहाव्याशा वाटल्या. अर्थात, ते वाचक नजरेसमोर ठेवूनच. सर्वांत प्रथम म्हणजे ‘सकाळ’मधील माझ्या आगमनाचे अनेक पडसाद समाजात उमटले. ‘पवार’ या आडनावापासून शरद पवार ते एखाद्या बुद्धिमान, कर्तृत्ववान व्यक्ती किंवा कुटुंबाकडे ‘सकाळ’ जायला हवा होता, ही पहिली प्रतिक्रिया होती. ‘आता ‘सकाळ’चं भवितव्य सुरक्षित नसल्याचं स्पष्ट दिसत आहे,’ अशी प्रतिक्रिया जनसामान्यांत उमटली. विशेष म्हणजे, मी कोण आहे, माझी पार्श्वभूमी काय आहे याचा कोणीही क्षणभरही विचार केला नाही. आपापली मते व्यक्त करून ‘हळहळ’ मात्र व्यक्त केली. त्यामुळेच आजही या प्रवासाबद्दल लिहावेसे वाटते.