पुणे : माझे वडील आर्मीमधून वयाच्या ४५ व्या वर्षी निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी दोन ठिकाणी नोकरी केली पण ती फार काळाची नव्हती. आता त्यांचे वय ५६ वर्ष इतके आहे. ते त्यांचा बहुतांशी वेळ फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, व्हाट्स अँप यांसारख्या अँप्सवर घालवतात.
खूपदा ते त्यांचा वेळ काही रॅन्डम व्हिडीओ, काहीही मतप्रदर्शन करणारे व्हिडीओ बघत बसतात. त्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे यासाठी मी त्यांना बागकाम किंवा तसंच काहीसं करायला सांगते पण त्यांना त्या गोष्टी करायला आवडत नाहीत. यातून त्यांच्यामध्ये काहीशी नकारात्मकता येत असल्याचे मला जाणवते आहे..
या सगळ्यातून मला त्यांना कसे बाहेर काढता येईल...? रेड इट सारख्या समाजमाध्यमांवर एका मुलाने विचारलेला हा प्रश्न..
आयटीमध्ये काम करणाऱ्या प्रियाला देखील हाच प्रश्न पडला आहे. तिचेही वडील खासगी नोकरीतून निवृत्त झाले आलेत. काही कारणामुळे त्यांना त्यांचे अनेक वर्षाचे घर सोडावे लागले. त्यामुळे त्यांचे मित्रमंडळ देखील सोबत राहिले नाही.
आजही निवृत्तीनंतर ते अनेक गोष्टी करायचा प्रयत्न करतात पण ते रिकामपण त्यांना घालवणे शक्य होत नाही. अशा वेळी ते मोबाईलमध्ये बराच वेळ रील्स आणि व्हिडीओ बघण्यात वेळ घालवतात.
यातून अनेकदा निराशा, कुणावर तरी अवलंबून आहोत याचा न्यूनगंड, आता आपल्याला घरात प्राधान्य नाही असे वाटू लागते, स्वतःबद्दल कमीपणाचं विचार करतात. ते सध्या ६३ वर्षांचे आहेत. त्यांच्यात काम करण्याची ऊर्जा देखील आहे फक्त मुलगी म्हणून मला त्यांना योग्य दिशा दाखवायची आहे आणि या न्यूनगंडातून बाहेर काढायचे आहे.